वकिलाच्या तक्रारीवरून एसीबीची मोठी कारवाई
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत सहाय्यक महसूल अधिकारी कैलास भगवान मुरकुट यांना २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे पेशाने वकील असून त्यांच्या नातलगाच्या जमिनीच्या फेरफार प्रकरणातील अंतिम आदेशाची मूळ प्रत देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर अॅन्टी करप्शन ब्युरो, वाशीम पथकाने सापळा रचला.
16एप्रिल 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर येथे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मुरकुट यांनी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.