बुलडाणा, (जिमाका) दि. ११ : जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा अभ्यास रजेवर गेल्यानंतर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षन्मुखराजन एस. यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या रिक्त असलेल्या पदावर बदली आदेशान्वये नियुक्त झालेले एस. राममूर्ती यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
जिल्हाधिकारी राममूर्ती 2013 च्या आयएस बॅचचे आयएएस अधिकारी आहेत त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1980 रोजी झाला आहे. त्यांनी अभियांत्रिकी विद्याशाखेत स्थापत्य अभ्यासक्रमात स्नातक पदवी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर, त्यानंतर नागपूर येथे खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्य केले आहे. ते मूळचे तामिळनाडू राज्यातील आहेत. रुजू झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग, नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणारे उपाय योजना, कोविड केअर सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, रुग्ण वाढीचा दर, कोरोना बाधित मृत्युदर, चाचण्यांची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न सोडवून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी एस. राममूर्ती यांनी सांगितले.