बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शासनाने प्रत्येक गाव, वाडी व वस्त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी जल जिवन मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक घराला दरडोई दररोज 55 लीटर पाणी प्रत्येक कुटूंबाला पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार या मिशनमध्ये नवीन नळयोजना प्रस्तावीत कराव्यात. मिशनमधील आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या योजनांची कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जलजीवन मिशन आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते. तसेच सभागृहात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घोडे, उपविभागीय अभियंता एस आर वारे, पी एल लोखंडे आदी उपस्थित होते.
या आराखड्यातंर्गत समाविष्ट गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी पुरवठ्याची कामे करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री महणाले, गावांमधील योजनांची पुनरावृत्ती टाळावीत. योजनेसाठी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत बघावा. पाण्याअभावी काही दिवसानंतर योजना बंद पडतात. परिणामी शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे अंतर जास्त असले, तरी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत घ्यावा. प्रादेशिक योजनांवर जास्तीत जास्त भर द्यावा. गावाचा समोवश करताना तेथील गरज, लोकप्रतिनिधींची मागणी आदींचा विचार करावा. आराखडा अंतिम करून विहीत कालावधीत शासनास सादर करावा. याप्रसंगी तालुकानिहाय नवीन नळयोजना, प्रादेशीक नळयोजना, स्वतंत्र पाणी पुरवचठा योजना, क्षमतावृद्धी करण्यात येणाऱ्या योजना आदींचा आढावा घेण्यात आला.