तर पुन्हा होऊ शकते ‘लॉकडाऊन Yavatmal covid-19 - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, February 17, 2021

तर पुन्हा होऊ शकते ‘लॉकडाऊन Yavatmal covid-19

                                                                  जिल्हाधिकारी सिंह

यवतमाळ, दि. 17 : गत तीन – चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढतच राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा सोडून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. अन्यथा पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद येथून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी स्वत:च्या तसेच दुस-यांच्या आरोग्यासाठी आतातरी निष्काळजीपणा सोडावा. शासन आणि प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी पोलिस अधिक्षकांना दिले. 

रुग्णसंख्या वाढणा-या तीन ठिकाणाहून प्रति दिन प्रत्येकी 500 याप्रमाणे दिवसाला 1500 नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. यात 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के रॅपीड ॲन्टीजन टेस्ट करा. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच डीसीएच, डीसीएचसी आणि खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावा. 

यंत्रणेने अलर्ट राहून हाय -रिस्क काँटॅक्ट, लो-रिस्क काँटॅक्ट, ट्रेसिंग, उपचार आदी जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हा आरोग्य अधिका-यांनी नमुन्यांची चाचणी करण्याकरीता इमारतीची मागणी केली आहे. सदर इमारत संबंधित तहसीलदारांनी त्वरीत अधिग्रहीत करावी. तीन – चार दिवसांत रुग्णसंख्येत कमतरता आली नाही तर तीन शहरात लॉकडाऊनची परिस्थती येऊ शकते, असाही इशारा त्यांनी दिला.

जिल्ह्यातील 25338 फ्रंटलाईन वर्कर्सची माहिती कोविड लसीकरण पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 9951 जणांना लस देण्यात आली असून उर्वरीत लोकांचे लसीकरण 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.

००००००००

Post Top Ad

-->