Collector's appeal to farmers शेतमालाची विक्री कृषि उत्पन्न बाजार समितीमध्येच करा: जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, October 22, 2023

Collector's appeal to farmers शेतमालाची विक्री कृषि उत्पन्न बाजार समितीमध्येच करा: जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा दि. 22 जिमाका : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला शासनाने प्रती क्विंटल हमीभाव जाहिर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल हमीभाव व  बाजारभाव बघून  नजीकच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करावे. जेणे करून शेतकऱ्यांना आपल्या उत्पादित मालाला योग्य किंमत मिळेल.

 शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल काढणी हंगामात त्याच्या आर्थिक निकडीमुळे त्वरीत विक्रीसाठी बाजारात आणतात. त्यामुळे विक्रीसाठी एकाचवेळी बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होवून बाजारभाव कमी होतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा  शेतमालाची काही काळासाठी साठवणूक करुन बाजारभाव चांगले असताना साठवणुकीतील शेतमाल टप्याटप्याने विक्रीसाठी आणला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज योजना

शेतकऱ्यांना असणारी आर्थिक अडचण पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या शेतीमालासाठी रास्त भाव मिळावा यासाठी कृषि पणन मंडळामार्फत शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गोदामात अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या गोदाम पावतीवर शेतमालाच्या चालू बाजारभावानुसारच्या रकमेच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम त्या शेतकऱ्यास 180 दिवसांच्या मुदतीसाठी द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने तारण कर्ज बाजार समितीकडून त्वरीत देण्यात येते. शेतमाल तारण कर्ज योजनेत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी अशा पिकांचा समावेश आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. 

शेतमालाचा हमीभाव व बाजारभाव याप्रमाणे :

हमीभाव प्रती किंटल :  गहु 2275 रुपये,  ज्वारी 3180 रुपये, मका 2090 रुपये, चना 5440 रुपये, तुर 7000 रुपये, मुंग 8558 रुपये, उडीद 6950 रुपये, सोयाबीन 4600 रुपये, कापूस 6620 रुपये प्रमाणे.

सरासरी बाजारभाव प्रती किंटल : गहु 2800 रुपये,  ज्वारी 2800 रुपये, मका 2090 रुपये, चना 5255 रुपये, तुर 11550 रुपये, मुंग 9700 रुपये, उडीद 8500 रुपये, सोयाबीन 4450 रुपये, कापूस 6500 रुपये प्रमाणे.

शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेरील व्यापाऱ्याकडे परस्पर माल विकल्यास फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा माल हमीभाव व बाजारभाव बघूनच  कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विकावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Post Top Ad

-->