अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, August 28, 2020

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी


चंद्रपूर, दि. 28 ऑगस्ट: वाळू,रेती निर्गती सुधारीत धोरण 2019 नुसार अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याकरिता तसेच रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीची माहिती तात्काळ महसूल विभागास प्राप्त होणे व रोक लावण्याची कार्यवाही करण्याकरीता टोल फ्री 1800 233 6890 या क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तरतुद केलेली आहे. जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा खनिकर्म कार्यालय, उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्फत नियंत्रण ठेवण्यात येईल

शासन निर्णयातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरीता टोल फ्री क्रमांक 1800 233 6890 वर प्राप्त तक्रारीची भरारी पथकाव्दारे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टिने टोल फ्री क्रमांक हा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यान्वीत असून प्राप्त झालेल्या तक्रारीची नोंद घेऊन संबंधीतास पाठविण्यात येईल. टोल फ्री क्रमांकवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निनावी तक्रारीच्या नोंदी विहीत नमुन्यातील नोंदवहीमध्ये घेण्यात येईल. प्राप्त तक्रारीची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे तसेच संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावरील गस्तीपथकास यांना विनाविलंब ईमेल, दुरध्वनी वर पाठविण्यात येईल.

टोल फ्रि क्रमांक सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्या बाहेर फलक लावून प्रसिध्द करण्यात येईल. प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने करावयाचे कार्यवाहीबाबत परिवहन विभाग, पोलीस विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. प्राप्त तक्रारीच्या निपटाऱ्याबाबत आवश्यक नोंदी ठेवून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार हे दरमहा मासीक अहवाल जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे सादर करतील.

Post Top Ad

-->