भंडारा जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनला पाठवले पत्र
भंडारा, दि. 26 - जिल्ह्यातील सर्व औषधी विक्री दुकानात विना वैद्यकिय सल्ला पॅरासिटमॉल विक्री न करणेबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकारी, भंडारा यांचे समवेत भंडारा जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनची सभा नुकतीच झाली. या सभेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनला पत्र पाठवून याबाबत औषध विक्रेत्यांना सूचित करण्यास सांगितले आहे.
सद्यस्थितीत संपुर्ण जगात कोव्हिड-19 या विषाणुमुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. सदर विषाणुमुळे होणाऱ्या कोरोना रोगास पायबंद घालण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. सदर विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असुन सदर बाबीस प्रतिबंध घालण्यास्तव
जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सदर विषाणुचा मानवाला संसर्ग झाल्यास दिसुन येणाऱ्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी इत्यादींचा समावेश आहे. सबब लक्षणे दिसताच तात्काळ कोरोना निदान चाचणी केल्यास संसर्गीत रुग्णांची ओळख होऊन त्यांना वेळीच योग्य औषधोपचार दिल्यास संबंधितांच्या जिवास असणारा धोका टाळता येतो.
सदर लक्षणे दिसल्यावर साधारणपणे नागरीक हे ताप क्षामक व दु:ख नाशक औषधींचे प्राशन करतात. सदर औषध सेवनामुळे संबंधिताचे लक्षणे हे तात्पुरत्या स्वरुपात नाहिसे होऊन सदर व्यक्तिस विषाणूचा संसर्ग झाला आहे किंवा कसे याबाबत माहिती पडण्यास अडसर निर्माण होते. यामुळे जिल्ह्यात अचानक मोठ्य प्रमाणात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव ऊफाळून येऊन अनेक नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याबाबत केमिस्ट व ड्रागिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सभेत अवगत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानदार यांना त्यांचे दुकानात पॅरासिटामॉल हे ड्रग व पॅरासिटामॉल मिश्रीत असलेले इतर सर्व औषधांची विक्री केवळ वैद्यकिय चिठ्ठी (प्रिसक्रिप्शन) असल्याशिवाय ग्राहकांना देऊ नये याबाबत औषध विक्रेत्यांना सुचित करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुकानदार यांचे परवाना रद्द करण्याची कारवाई करुन त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 अन्वये कारवाई करण्यात येईल यांबाबत नोंद घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले आहे.