धान ऊत्पादन शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार मदत देणार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 4, 2020

धान ऊत्पादन शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार मदत देणार


- मंत्री विजय वडेट्टीवार

• प्रति कुटुंब 10 हजार तातडीची मदत 

• कृषी पंपाचे विज बील माफ करण्याचा प्रयत्न

• नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

• पुरग्रस्त भागांची पाहणी


भडारा दि.04 : पुरामुळे नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20 हजार रूपये मदत देण्यात येईल. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून कृषी पंपांचे विज माफ करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. घरात पाणी शिरलेल्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून 10 हजार रूपये देण्यात येईल. घराचे पुर्णता: नुकसान झालेल्या कुटुंबाला 95 हजाराची मदत शासन देणार असून मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही, मदत व पुर्णवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदिप कदम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी संदिप भस्के, तहसिलदार अक्षय पोयाम व विविध विभागाचे अधिकारी यावेळी  उपस्थित होते.

पुर परिस्थितीमुळे 103 गावातील 8 हजार 251 कुटुंब बाधित झाले. 186 घर पुर्णता: तर 2 हजार 743 घर अंशता: बाधित झाले आहेत. 21 हजार 795 हेक्टर शेतीचे 33 टक्क्याच्या वर तर 7 हजार 52 हेक्टर शेतीचे 33 टक्क्याच्या आत नुकसान झाले आहे. पुरामुळे 378 गावातील 38 हजार 921 शेतकरी बाधित झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 53 रस्त्यांचे नुकसान झाले. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी 70 कोटी अनुदानाची आवश्यक्ता आहे. जिल्हयात 158 पशुधन वाहून गेले असून 12 हजार कोंबडया मुत्यूमूखी पडल्या. पुरवठा विभागाच्या गोदामात पाणी शिरल्याने 6 हजार 260 क्विंटल धान्य खराब झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्ह्याला 41 कोटी रूपये निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरामुळे भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश श्री. वडेट्टीवार यांनी दिले. पंचनामे करतांना नुकसानग्रस्त प्रत्येक व्यक्तीच्या घराचा व शेतीचा प्रत्यक्ष पंचनामा करून नुकसानग्रस्त नागरीकांची यादी ग्रामपंचायतच्या सुचना फलकावर लावण्यात यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. नुकसान झालेल्या कुठल्याही व्यक्तीवर किंवा शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये, असे ते म्हणाले. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रूपये मदत देण्यात येईल, असे सांगून श्री. वडेट्टीवार म्हणाले की शेतीचे नुकसान मोठया प्रमाणात झाले असून कृषी पंपाचे विज बील माफ करण्यासाठीचा प्रस्ताव आगामी मंत्री मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. 




शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. गरज पडल्यास निकषात बदल करण्याचे शासनाचे धोरण आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवर पुरग्रस्तांना मदत करण्यात येईल. घरात पुराचे पाणी शिरलेल्या कुटुंबांना तातडीची 5 हजार रूपये व पुढील आठवडयात 5 हजार अशी 10 हजार रूपये मदत करण्यात येणार आहे. पंचनामे झाल्यानंतर उर्वरीत रक्कम देण्यात येईल. घराच्या पुर्णता: नुकसाणीसाठी 95 हजार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतीच्या नुकसाणीबाबात बोलतांना श्री. वडेट्टीवार म्हणाले की, सातबारावर नाव असलेल्या प्रत्येकाला समान मदत दिली जाईल. गाव नुमणा आठवर नोंद असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला घराची नुकसान भरपाई देण्यात येईल. ही सर्व मदत एका महिण्याच्या आत दिली जाईल. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचाही लाभ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कृषी विभागाने रब्बीचे नियोजन आताच करावे. शेतकऱ्यांना बियाणे देण्याची व्यवस्था करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील रस्ते, मामा तलाव, बांध व नाल्याच्या दुरूस्तीचे प्रस्ताव तात्काळ शासनाला पाठवावे असे ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुरपरिस्थिती निर्माण झाली असून साथरोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी. विशेष शिबीर लावून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी. तात्पूरत्या राहत शिबिरात ठेवण्यात आलेल्या नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात यावी. भंडारा शहरात 14 टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. विविध भागात असलेल्या 19 आरओद्वारे 2.50 लाख लिटर पाणी नागरिकांना पुरविल्या जात आहे, असे यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

श्री. विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसीय भंडारा जिल्याच्या दौऱ्यात लाखांदूर, पवनी, तुमसर, मोहाडी, भंडारा तालुक्यातील अनेक पुरग्रस्त भागाची पाहाणी करून नागरिकांना धिर दिला. अनेक गावातील नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केली. गावातील सर्व नागरिक पुनर्वसनासाठी सहमत असल्याचा ग्रामसभेचा लेखी ठराव शासनाला प्राप्त झाल्यास पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.





यंत्रणा सक्षमीकरणासाठी 2 कोटी

 आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरण व साहित्य खरेदी करण्यासाठी भंडारा जिल्हयाला 2 कोटी रूपये तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. साहित्य खरेदीचा प्रस्ताव तात्काळ पाठविण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी 400 कोटी रूपये खर्च करून आधूनिकीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Top Ad

-->