मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, September 23, 2020

मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली



मुंबई :
 मुंबईत रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईतील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर रस्त्या-रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. तर बेस्ट बसची वाहतूकही वळवण्यात आली आहे.

मुंबईतील चारही रेल्वे लाईन सेवा ठप्प 

मध्य रेल्वेच्या सायन, चुनाभट्टी, कुर्ला या स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे सीएसएमटी ते ठाणे, तर सीएसएमटी ते वाशी ही रेल्वे सेवा रद्द केली आहे. तसेच ठाणे ते कर्जत, कसारा, वाशी, पनवेल या ठिकाणी विशेष लोकल धावत आहेत. त्यामुळे मुंबईतील चारही लाईन बंद असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे

पश्चिम रेल्वेची वाहतूक रद्द 

मुसळधार पावसामुळे चर्चगेट ते अंधेरी स्थानकादरम्यान रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहेत. तर अंधेरी ते विरार या ठिकाणची लोकल वाहतूक सुरळीत सुरु आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

बेस्ट बसची वाहतूक वळवली

मुंबईतील भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, हिंदमाता, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस या भागात पाणी साचले आहे. त्यामुळे बेस्ट बसची वाहतूक वळवण्यात आली आहे. सखल भागातील अनेक बेस्ट बस या उड्डाणपुलामार्गे वळवण्यात आल्या आहेत.

-उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
-भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
-सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
-मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)
– लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
– भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे

मुंबईत तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तसेच नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.

Post Top Ad

-->