२२ तरुणांनी स्वत:हून मेडिकलशी संपर्क साधला
नागपूर : ऑक्सफोर्ड विद्यापीठात विकसित होणाऱ्या कोविशील्ड या करोनावरील लसीच्या मानवी चाचणीसाठी सुमारे २२ तरुणांनी स्वत:हून मेडिकलमध्ये संपर्क साधल्याची माहिती आहे. पुण्याहून या लसी मेडिकलमध्ये आल्यावर चाचणीसाठी नोंदीसह लस देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
मेडिकलमध्ये सुमारे ६० ते १०० स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार आहे. एकदा लस टोचल्यावर पुन्हा २८ दिवसांनी ती दुसऱ्यांदा टोचली जाणार आहे. पहिली लस दिल्यापासून सलग सहा महिने स्वयंसेवकांच्या आरोग्यावर मेडिकलचे डॉक्टर नजर ठेवणार आहेत. या काळात स्वयंसेवकांच्या शरीरात प्रतिपिंड तयार होतात काय, त्याचे प्रमाण व इतरही गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार आहे. या लसी एक ते दोन दिवसांत मेडिकलला येणार आहेत. लसी पोहोचल्यावर इच्छुकांच्या विविध तपासण्याकरून चाचणीची प्रक्रिया सात दिवसांत सुरू होण्याची शक्यता मेडिकलच्या डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख व कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूचे प्रमूख डॉ. सुशांत मेश्राम यांच्याकडे आहे. ‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ही लस माकडांवर पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. या प्रकल्पावर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचेही लक्ष आहे.
भारत बायोटेकच्याही लसींची चाचणी
डॉ. गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील केंद्रात स्वदेशी बनावटीची भारत बायोटेक, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी तयार केलेल्या लसीचीही दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे करोनावरील लसीची चाचणी करणारे मेडिकल हे शहरातील दुसरे केंद्र असणार आहे.