महिला उत्तम व्यास्थापक ग्रामीण भागातील उद्योजिका महिला व संसाधन व्यक्तींचा सत्कार
वर्धा, दि 4(जिमाका):- महिला या उपजतच उत्तम व्यवस्थापक आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कुशलतेमुळे त्या घर आणि बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम करू शकतात. बलशाली भारत घडवण्यासाठी देशातील महिलांना आर्थिक,वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बरोबरीची भागीदारी, सुरक्षा व सन्मान दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयं सह्ययता समुह उद्योगिनी व समूह संसाधन व्यक्ती यांच्या यशोगाथाचे सादरीकरण मान्यवरांच्या समोर करण्यात आले. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना श्री केदार बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बालकल्याण सभापती सरस्वती मडावी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास सपकाळ, उमेद अभियानाच्या जिल्हा समन्वयक स्वाती वानखडे उपस्थित होत्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेंद्रिय शेतीबाबत चार मिनिट माहिती देणाऱ्या सविता येळणे, आणि अमेरिकेला बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या उद्योगांचे सादरीकरण करून आलेल्या संगीता गायकवाड या महिलांचे कौतुक करून श्री. केदार म्हणाले, पाश्चिमात्य देशात दरडोई उत्पन्न जास्त आहे कारण तिथे स्त्री आणि पुरुष दोघांना कामाच्या समान संधी उपलब्ध आहेत. आपल्या देशात अशा संधी महिलांसाठी त्यामानाने खूपच कमी आहेत. महिला बचत गटांच्या उद्योगांसाठी फिरते भांडवल, बाजार व्यवस्था उभी करावी लागेल. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी मेळावे घेतले, त्याचप्रमाणे महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मेळावे घेण्याची गरज आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यास महिला आश्चर्यकारक उद्योग उभे करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हॉकर्स प्लाझामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. महिलांना प्रोत्साहित करून, बळकट करून, बरोबरीचे स्थान देऊन यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घ्यावे लागेल असे ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील महिला बचत गटांनी कोरोनाच्या काळात ॲमेझॉन वर ऑनलाइन केलेल्या विक्रीबाबत त्यांनी महिलांचे कौतुक केले. महिला बचत गटांना त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी कुठल्याही अडचणी आल्यास पालकमंत्री म्हणून खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे जिल्ह्यातील महिला बचत गटांचे कौतुक करताना म्हणाल्या, बचत गटाच्या महिलांनी जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. महिलांना संधी दिली तर त्या आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. जिल्ह्यातील महिलांना उमेदने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. महिला खंबीर, कणखर असतात. त्या कधीही खचून जाऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाहित असे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुढील वर्षाचे आदेश काढून कर्मचाऱ्यांना बेरोजगार होण्यापासून वाचवावे, यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी श्रीमती गाखरे यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आपल्या जिल्ह्यातील बचत गटाच्या महिला प्रामाणिकपणे उद्योग करतात असे सांगून वर्धेत 99.28 टक्के महिला बचत गटाने कर्जाची परतफेड केली असल्याचे सांगितले. देशात बचत गटांचे एन पी ए होण्याचे प्रमाण केवळ एकच टक्के आहे असे ते म्हणाले. महिलांना मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून दिल्यास त्या कष्टाने, गुणवत्तेच्या जोरावर चमत्कार करून दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये स्नेहा घनमोडे, सुनिता वाघमारे, शितल भोयर, राजश्री म्हैसकर, ज्योती पाटील, सविता नेहारे, सुनंदा भगत, सविता येळणे, सुनिता राठोड, नंदा जुन्हारे, संगीता गायकवाड वनिता आदुलकर या महिलांचा त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी सत्कार करण्यात आला. महिलांनी यावेळी त्यांच्या यशाचा प्रवास सर्वांसमोर मांडला. तसेच उमदच्या यशस्विनी यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी केले तर आभार स्वाती वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद झामरे यांनी केले. कार्यक्रमाला सोशल डिस्टसिंगचे पालन करून बचत गटाच्या महिलांची उपस्थिती होती.