अमरावती, दि. ३: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विविध दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या संवाद साधून त्यांना दिलासा दिला. या कुटुंबांवर दुर्देवाने आपत्ती ओढवली आहे. त्यांना शासनाकडून योग्य ती सर्व मदत मिळवून देण्यात येईल. या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण सर्वांच्या पाठीशी राहू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दुर्देवी दुर्घटनेची आपत्ती ओढवलेल्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी व त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी काल व आज विविध ठिकाणी भेटी देऊन या कुटुंबांचे सांत्वन केले. आज त्यांनी तिवसा तालुक्यातील शिवणगाव, गुरुदेवनगर, मोझरी, शिरजगाव (मो.) यासह विविध ठिकाणी भेटी दिल्या. दुर्देवाने कोसळलेला दु:खाचा डोंगर सहन करण्याचे बळ सर्वांना मिळो. शासनाकडून जी जी मदत करता येईल, ती सर्व मिळवून देण्यात येईल. आपण स्वत: एक कुटुंबीय म्हणून, बहीण म्हणून पाठीशी राहू, अशा शब्दांत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दु:खितांना दिलासा दिला.
नियतीपुढे आपण सारेच हतबल आहोत.पण पालकमंत्री म्हणून मी तुमचे दुःख, वेदनेची तीव्रता कमी व्हावी म्हणून आले आहे. ज्या मातीत बालपण गेले तिथली उदंड प्रेम करणारी माणसे, त्यांचे दुःख, वेदना ही माझ्याहून वेगळी असूच शकत नाही,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तिवसा तालुक्यातील शिवणगाव, त्यानंतर गुरुदेव नगर येथे त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यानंतर मोझरी येथील सुराज गिरी यांच्या कुटुंबाची भेट घेतली, काही गोष्टी आपल्या हातात नसतात,पण तरी सुद्धा हे दुःख पचवून आयुष्याचा संघर्ष असाच सुरू ठेवावा लागेल अशी संवेदना त्यांनी व्यक्त केली.
त्यानंतर येथीलच मयूर टप्पे या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे दुःखाचा आघात झालेल्या टप्पे कुटुंबाची त्यांनी भेट घेतली,यावेळी मयूरच्या कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या होत्या. पालकमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले व दिलासा दिला. त्यानंतर मालधुर येथील नानाजी साबळे व धुमनखेडे कुटुंबाची त्यांनी भेट घेतली,त्यांनाही धीर दिला.तसेच येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला चर्चा केली.मी कुठेही असले तरी,माझी भावनिक दृष्ट्या तुमच्याशी नाळ जुळली आहे. तुम्ही हाक दिली,अन मी त्याला ओ देणार नाही,असे होऊच शकत नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दुर्देवी दुर्घटनांत हानी झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी प्रशासनाला दिले.