(छायाचित्रे संग्रहित )
रेडा :-धूरमुक्त स्वयंपाक घर' ही संकल्पना राज्य सरकारची नव्हे; तर केंद्र सरकारची होती. मात्र या संकल्पनेला गॅसदरवाढीने छेद दिला आहे. सरकारने दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गत कमी पैशातला गॅस देण्याची भूमिका ठेवली होती. यातील लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरसह सहा महिन्याचे गॅस टाक्या पुरवण्यात आल्या होत्या. आता अचानकच अशा लाभार्थ्यांना देखील आता एका टाकीला साडेआठशे रुपयांच्या आसपास पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे इंदापूर तालुक्यातील उज्ज्वला लाभार्थी प्रचंड त्रस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
करोना प्रादुर्भावामुळे एक तर, इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गोरगरीब कुटुंबांचे कंबरडे मोडलेले आहे. यामध्ये अर्थकारण प्रचंड खालावलेले असून अनेक लोकांच्या आजही हाताला काम नाही. गरजेच्या वस्तू खरेदीसाठी देखील उसने वारी पैसे घेऊन गोरगरीब उपेक्षित कुटुंबांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. अशा आर्थिक दारिद्र्यात जीवन जगत असताना गॅसच्या वाढलेल्या किमती, यासाठी एवढे पैसे मोजायचे? हा विचार गोरगरिबांना सतावून सोडणार आहे.
(छायाचित्रे संग्रहित )
ग्रामीण भागामध्ये जवळपास बहुतेक गावांमध्ये धूरमुक्त गरीब कुटुंब झाले होते; मात्र गगनाला पोहोचलेल्या गॅस किंमती यामुळे पुन्हा घरटी चुली पेटलेल्या दिसत आहेत. मागील लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये अनेकांना हाताची कामे गेलेली आहेत. त्यामुळे आजही शेकडो मजूर घरीच बसून आहे आहेत.
इंदापूर तालुका अनलॉक झाला असला, तरीदेखील काही उद्योग रुळावर येण्यास वेळ जात आहे. सामान्य जनतेसाठी लागणारे सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. असाच गोरगरीबांची भाकरी भाजणारे गॅस दर वाढवले असल्यामुळे, सर्वसामान्य नागरिक जेरीस आलेले आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना इंधन जमा करण्याची कटकट डोक्यातून गेली होती; परंतु आता मागचे दिवस या महिला भगिनींसाठी पुढे आलेले दिसत आहेत.
कमाई सर्व गॅस वरच
इंदापूर तालुक्यातील बावडा, नीरा नरसिंहपूर, निमसाखर निमगाव केतकी या परिसरातील अनेक उपेक्षित गरीब कुटुंब तसेच जी दुष्काळी गावे 22 आहेत. यामधील हजारो कुटुंब यांचा खऱ्या अर्थाने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वेळेची पोट भरण्याची भ्रांत असताना, स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर कोठून आणायचा? हा प्रश्न उज्ज्वला लाभार्थी महिलांना पडलेला दिसतो आहे. करोना संकटामुळे हात मजुरी करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. बाहेर रोजगार शोधून देखील मिळेना. त्यामुळे कमाई सर्व गॅस वरच असे विदारक समोर येत आहे.
नव्या पिढीला गॅसशिवाय जमेना
शहरी भागातील महिलांना गॅसवर कमी वेळात जास्त स्वयंपाक करता येतो. हे सूत्र ग्रामीण भागातील महिलांना देखील या उज्ज्वला गॅस योजने मुळे सहज शक्य झाले होते. तर दिवसभर राना - माळातून स्वयंपाकासाठी सरपण गोळा करून आणायचे, शेतात दिवसभर राबायचे, हा नित्यक्रम महिलांचा थोड्या कालावधीसाठी स्तब्ध झाला होता. मात्र जुन्या महिलांना याची सवय होती. नव्या पिढीला गॅसशिवाय स्वयंपाक करताना अडचण येत आहे.