२४ तासांत पुन्हा ३३ करोनाग्रस्तांचा मृत्यू(Nagpur-covid) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 24, 2021

२४ तासांत पुन्हा ३३ करोनाग्रस्तांचा मृत्यू(Nagpur-covid)

(छायाचित्रे संग्रहित) 

जिल्ह्य़ात करोनाचा प्रकोप सुरूच असून गेल्या २३ दिवसांत येथे तब्बल ३६२ करोनाग्रस्तांचा मृत्यू

 नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचा प्रकोप सुरूच असून गेल्या २३ दिवसांत येथे तब्बल ३६२ करोनाग्रस्तांचा मृत्यू तर ४९ हजार ९८३ नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय मागच्या २४ तासांत ३३ मृत्यू व ३ हजार ९५ नवीन रुग्ण आढळले.

शहरात १ मार्च ते २३ मार्च २०२१ या २३ दिवसांमध्ये ३९ हजार २२६, ग्रामीण १० हजार ६९२, जिल्ह्य़ाबाहेरील ६५ असे एकूण ४९ हजार ९८३ रुग्ण आढळले. त्यात मंगळवारी दिवसभरात शहरात आढळलेल्या २ हजार २७२, ग्रामीण ८१९, जिल्ह्य़ाबाहेरील ४ अशा एकूण ३ हजार ९५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या १ लाख ५८ हजार ७२०, ग्रामीण ४० हजार ४३, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ८ अशी एकूण १ लाख ९९ हजार ७७१ रुग्णांवर पोहोचली आहे.  २४ तासांत शहरातील १९, ग्रामीण १०, जिल्ह्य़ाबाहेरील ४ अशा एकूण ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंमूळे शहरातील आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या ३ हजार ६, ग्रामीण ८६५, जिल्ह्य़ाबाहेरील ८२६ अशी एकूण ४ हजार ६९८ रुग्णांवर पोहोचली आहे.

तब्बल २,१३६ व्यक्ती करोनामुक्त

शहरात दिवसभरात १ हजार ७६४, ग्रामीण ३७२ असे एकूण २ हजार १३६ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ३१ हजार ७९४, ग्रामीण ३१ हजार २८७ अशी एकूण १ लाख ६३ हजार ८१ व्यक्तींवर पोहोचली आहे.  करोनामुक्तांचे प्रमाण ८१.६३ टक्के आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३२ हजारांवर

शहरात सध्या २४ हजार ६६२, ग्रामीण ७ हजार ३३१ असे जिल्ह्य़ात एकूण ३१ हजार ९९३  उपचाराधीन  रुग्ण आहेत. त्यातील २५ हजार ४२ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ३ हजार ८५६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

२४.५१ टक्के अहवाल सकारात्मक

शहरात दिवसभरात ९ हजार ४२९, ग्रामीण ५ हजार ५२७ अशा एकूण १४ हजार ९५६ चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल बुधवारी येतील. सोमवारी जिल्ह्य़ातील १२ हजार ६२३  चाचण्यांत ३ हजार ९५ व्यक्तींना करोनाचे निदान झाले.  सकारात्मक अहवालाचे प्रमाण २५.५१ टक्के आहे.

आणखी तीन मनोरुग्णांना करोना

प्रादेशिक मनोरुग्णालयात आणखी तीन मनोरुग्णांना करोना असल्याचे मंगळवारी पुढे आले. त्यामुळे येथील  आजपर्यंतच्या बाधितांची संख्या थेट २२ वर पोहोचली आहे. नवीन बाधितांमध्ये महिला व पुरुष अशा दोन्ही गटातील रुग्णांचा समावेश आहे.  येथे सेवा देणाऱ्या टाटा ट्रस्ट आणि येथील इतर कर्मचारी अशा एकूण ९ जणांना बाधा झाली आहे.  मनोरुग्णांवर उपचारासाठी येथे एक विशेष वार्ड तयार करण्यात आले असून तेथे तज्ज्ञांच्या देखरेखीत  उपचार सुरू आहेत.  टाटा ट्रस्टचे कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. या वृत्ताला प्रादेशिक मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

आजपासून पुन्हा ‘करोना संवाद’

करोनाविषयीच्या अनेक शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी गेल्या वर्षभरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने दोन  महिने महापालिकेने ‘करोना संवाद’ हा कार्यक्रम राबवला. गेल्या काही दिवसात पुन्हा  रुग्ण वाढत असल्याने उद्या २४ मार्चपासून  हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम नव्याने सुरू होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून व आय.एम.ए.च्या सहकार्याने उद्या दुपारी ३ वाजता इंडियन मेडिकलच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी आणि सचिव डॉ. राजेश सावरबांधे हे  कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित राहतील. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या ‘कोविड संवाद’ कार्यक्रमाचा विषय ‘कोविड-१९ लसीकरण’ हा राहणार आहे. एक तासाच्या या  कार्यक्रमात नागरिकांनी विषयाशी निगडित प्रश्न विचारावेत. त्या प्रश्नांना तज्ज्ञ मंडळी उत्तरे देतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Top Ad

-->