• शहरी व ग्रामीण भागात कारवाईला सुरुवात
वाशिम, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व आस्थापनाधारकांनी २५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करून घ्यावी, कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांच्या आस्थापना २६ मार्च पासून बंद करण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले होते. त्यानुसार आजपासून कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांची दुकाने, आस्थापना बंद करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. शहरी व ग्रामीण भागात आस्थापनांची तपासणी करण्यात येत असून आज मालेगाव, कारंजा, शेलूबाजार येथील दुकाने बंद करण्यात आली आहेत.
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारक, व्यावसायिक यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार २१ मार्चपर्यंत सर्व आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली होते. कोरोना चाचणी न केल्यास संबंधित आस्थापना बंद करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांची दुकाने, आस्थापना बंद करण्याची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. आज मालेगाव शहरातील ३२, कारंजा शहरातील ९, मंगरूळपीर शहरातील ३८ व शेलूबाजार येथील १ आस्थापना बंद करण्यात आली.
मालेगाव शहरात एकूण १८७२ आस्थापना असून त्यापैकी ५१२ आस्थापनांची तपासणी आज करण्यात आली असून यापैकी ३२ आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी केली नसल्याने त्यांची दुकाने बंद करण्यात आली. तसेच मंगरूळपीर शहरातील तपासणीमध्ये ३८ आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्या आस्थापना सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मुख्याधिकारी विकास खंदारे यांनी दिली.
कारंजा शहरातील आस्थापनांची तपासणी करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून आजपासून तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ९ दुकानदारांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे आढळून आल्याने त्यांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका दुकानावर कारवाई करण्यात आल्याची माहिती कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब दोळारकर यांनी दिली.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आस्थापना, दुकानांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली असून आजपासून आस्थापनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.