(छायाचित्रे संग्रहित)
नागपूर : नागपुरात ४५ वर्षांहून अधिक व्यक्तींचे गुरुवारपासून लसीकरण सुरू झाले. महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात गुरुवारी सकाळी ८ वाजता लसीकरण सुरू करण्याची वेळ असतानाही ते अर्धा तास विलंबाने सुरू झाल्याने नागरिक ताटकळत होते. येथील कोव्हॅक्सिन लसीचे केंद्र असलेल्या मेडिकल आणि उत्तर नागपुरातील आंबेडकर रुग्णालय या शासकीय रुग्णालयांत मात्र नेहमीच्या तुलनेत जास्त नागरिक लसीकरणाला आले. शहरातील काही केंद्रांवर कमी व्यक्ती लसीकरणासाठी दुपारपर्यंत आल्याचे चित्र होते.
सध्या येथे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लसी वेगवेगळ्या केंद्रात आहेत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सर्व केंद्रांवर नागरिकांची गर्दी उसळण्याची अपेक्षा वैद्यकीय क्षेत्राला होती. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या आयसोलेशन, दटके रुग्णालयात दुपारी निवडक नागरिकच लसीकरणाला आल्याचे चित्र होते. तर ताजबाग प्राथमिक रुग्णालय केंद्रात दुपारी १ वाजेपर्यंत १० ते १५ जणच लसीकरणाला आले. महापालिकेकडून इंदिरा गांधी केंद्र सकाळी ८ वाजता सुरू होत असल्याचे सांगण्यात येते.
नियोजित वेळेनुसार येथे आठ वाजता नागरिक आले. परंतु केंद्राच्या बाहेरचे द्वार बंद होते. त्यामुळे नागरिक ८.३० वाजतापर्यंत ताटकळत राहिले. गर्दी वाढल्यावर काहींनी आक्षेप घेतल्यावर लसीकरण सुरू झाले. तर मेडिकल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन शासकीय केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध आहे. पैकी मेडिकलला रोज सुमारे १०० ते १५० नागरिकांचे लसीकरण होत होते. परंतु गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पहिली मात्रा १३४ व्यक्तींनी तर दुसरी मात्रा सुमारे
१०० व्यक्तींनी घेतली. त्यामुळे पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींची संख्या जास्त होती. तर आंबेडकर रुग्णालयात पूर्वी रोज १०० ते १२० व्यक्ती लसीकरणासाठी येत होते. परंतु गुरुवारी सायंकाळी ५ वाजता केंद्र बंद होईस्तोवर येथे सुमारे १५० व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला. शहर व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावरही कुठे जास्त तर कुठे कमी संख्येने लसीकरण नोंदवले गेले. काही केंद्रांवर इंटरनेटच्या समस्येमुळे नागरिकांना नोंदणीची समस्या उद्भवल्याच्या तक्रारी आहेत. परंतु केंद्राकडून काही वेळात हा प्रश्न सुटल्याचे सांगण्यात आले.
२२ हजार नागरिकांनी लस घेतली
केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार गुरुवारी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. शहरातील शासकीय व खाजगी अशा दोन्ही ८६ केंद्रांवर गुरुवारी १० हजार ८३५ नागरिकांनी पहिल्यांदा लस तर ११ हजार २२८ नागरिकांनी दुसऱ्यांदा अशा २२ हजार ५३ नागरिकांनी लस घेत लसीकरण अभियानाला प्रतिसाद दिला. विशेष ४५ वर्षांवरील नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. शहरामध्ये ४६ खाजगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सर्व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ना पूर्व नोंदणी करण्याची गरज नसून त्यांना केंद्रावर जाऊन ‘स्पॉट’ नोंदणी करून लस घेता येईल.
लसीकरणाला प्रतिसाद
लसीकरण मोहिमेला शहरातील शासकीय व खाजगी अशा दोन्ही ८६ केंद्रांवर गुरुवारी १० हजार ८३५ नागरिकांनी पहिल्यादा लस तर ११ हजार २२८ नागरिकांनी दुसऱ्यांदा अशा २२ हजार ५३ नागरिकांनी लस घेत लसीकरण अभियानाल प्रतिसाद दिला. विशेष ४५ वर्षावरील नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. शहरामध्ये ४६ खाजगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
‘ई- रिक्षा’तून जनजागृती
उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राकडून शुक्रवारपासून लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी ई-रिक्षावर उद्घोषण प्रणाली लावून फिरवली जाणार आहे. हे केंद्र शासकीय असून येथे नि:शुल्क कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. दरम्यान, ही ई-रिक्षा उत्तर नागपुरात सर्वाधिक वेळ फिरणार असून काही प्रमाणात गोळीबार चौक व नारीपर्यंत जाणार असल्याने लसीकरण वाढण्याची आशा असल्याचे या केंद्राचे प्रमुख डॉ. रवी चव्हाण यांनी सांगितले.