कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. washim covid-19 vaccine - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, April 2, 2021

कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. washim covid-19 vaccine



 
कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
• सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
• प्रतिबंधित क्षेत्राविषयीच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा
• कोरोना बाधिताच्या संपर्कातील प्रत्येकाची चाचणी आवश्यक
वाशिम, दि. ०१ (जिमाका) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आता ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील अपेक्षित पात्र व्यक्तींची संख्या निश्चित करून त्या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १ एप्रिल रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह महसूल, ग्राम विकास, आरोग्य, पोलीस आदी यंत्रणांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने व समन्वयाने काम करावे. प्रत्येक शहर व गावनिहाय लसीकरणास पात्र व्यक्तींची यादी तयार करून सदर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात लावावी. महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत कार्यरत महिला बचतगटांच्या सहाय्याने लसीकरण व कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत असलेल्या ४५ वर्षांवरील सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करावे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सहज पोहचता येईल, अशा सुविधा निर्माण कराव्यात.
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील घरांना भेटी देवून सर्वेक्षण आदी बाबींची प्रभावी अंमलबजावणी करावी. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी होणे आवश्यक असून यामध्ये कोणीही अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणमध्ये ठेवावे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, कोरोना लसीकरण मोहिमेत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेवून त्यांच्या माध्यमातून लोकांना लस घेण्याबाबत आवाहन करावे. ग्रामीण भागात जनजागृतीवर भर द्यावा. कोरोना चाचण्या व लसीकरण वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, मागील वर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वच यंत्रणांनी चांगले काम केले. त्यामुळे अनेक दिवस जिल्ह्यात कोरोना संसर्ग अतिशय कमी प्रमाणात होता. आता वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा सर्व यंत्रणांनी नव्या जोमाने व एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे. त्यामुळे लसीकरण वाढविण्यासोबतच कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्यास मदत होईल.
प्रारंभी श्री. हिंगे यांनी कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच लग्न समारंभ व इतर समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहिल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना याविषयी सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

Post Top Ad

-->