माती व पाण्याच्या समृद्धीतूनच समृद्ध गाव साकार होईल
- जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती
बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने आपल्या गावातील माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृदसंधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.
पाणी फाउंडेशनकडून 2020 पासून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेला महाराष्ट्रातील एकूण 39 तालुक्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये सहभागी गावाकरिता फेब्रुवारीमध्ये मिनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या गावांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वॉटर कप द्वितीय पुरस्कार विजेते गाव सिंदखेड ता. मोताळा येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात संबोधीत करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प राजेश लोखंडे, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. ढवळे, जि.प सदस्य निरंजन वाडे, गटविकास अधिकारी श्री. मोहोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. थोरात, तालुका कृषी अधिकारी श्री. कासार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, गावाच्या सामुहिक प्रयत्नातून सातत्यपूर्ण काम करीत राहिल्यास मोताळा तालुक्याचा नावलौकिक देशपातळीपर्यंत पोहोचेल. गावाच्या विकासाकरिता जिल्हा प्रशासनाचे पूर्ण क्षमतेने सहकार्य असणार आहे. उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड यावेळी म्हणाले, नरेगा योजनेच्या माध्यमातून लखपती कुटुंब समृद्ध कुटुंब ही संकल्पना राबविण्यात येत आहे. नरेगाची काम करण्याची पद्धत, आता बदलली असून मागेल ते काम देण्याची कार्यपद्धती सध्या रोजगार हमी योजने मार्फत राबविण्यात येत आहे. रोजगार हमीच्या योग्य नियोजनातून गावातील बेरोजगारी तसेच आर्थिक अडचण निश्चितपणे सोडवल्या जाऊन शाश्वत विकासाकडे वाटचाल करता येते.
कार्यक्रमामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम करत असलेल्या सर्व गावांची कामगिरी समाधानकारक राहीली आहे. तसेच समृद्ध गाव स्पर्धेबरोबरच गावाने गावाची एकी आणि नेकी टिकवून ठेवावी. त्याच्या जोरावर गावाचा विकास करावा. सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी सिंदखेड समृद्ध गाव स्पर्धेमध्ये करीत असलेल्या कामांची पाहणी केली. त्यामध्ये पर्जन्यमापक स्थळ, गावाने तयार केलेली गवत नर्सरी, बांधावरील वृक्ष लागवड, सोबतच 67 एकर वरती केलेली वृक्ष व गवत लागवडीच्या पाहणीचा समावेश आहे.
संपूर्ण शिवारफेरी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने गाव करीत असलेल्या कामाची पाहणी करून निरीक्षण केले. गावाची पुढील वाटचाल समजून घेतली. सन्मान सोहळ्यामध्ये जयपूर, जनुना, महाळुंगी जहागीर, वारुळी, पोखरी, चिंचपूर, पोहा, तिघ्रा, दाभा, उबाळखेड, शेलापुर खु, चिंचखेड नाथ आणि सिंदखेडा या 13 गावांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच पोफळी, लपाली, खामखेड, कोऱ्हाळा बाजार, अंत्री, रिधोरा जहागीर आणि भोरटेक या 7 गावांना सन्मानपत्र देऊन गौरवित करण्यात आले. मोताळा तालुक्यातील विजयी गावांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर सन्मान सोहळ्यामध्ये श्रीमती कामिनीबाई राजगुरू, उबाळखेड यांना युएनडीपी, जलशक्ती मंत्रालय आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर वुमन वारियर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक सुखदेव भोसले, पाणी फाउंडेशन, विभागीय समन्वयक यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप मोरे यांनी केले.