कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अर्जदाराला जम्बो सिलेंडर देण्याची शास्ती
जिल्हाधिकारी यांचे आदेश
( छायाचित्र संग्रहित )
वर्धा दि 6 ऑगस्ट :- एखाद्या व्यक्तीने कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी एका तक्रारदाराला तक्रार करण्याच्या आणि मागे घेण्याच्या त्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आगळी- वेगळी शिक्षा सुनावली आहे.
झाले असे की, जमिलखा रशीदखा पठाण राहणार तळेगाव (श्या प) तालुका आष्टी यांनी गावातील सरपंच आणि चार ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले असे दर्शवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी संबंधित सरपंच आणि सदस्यांना नोटीस काढून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अहवाल मागविण्यात आला. उत्तरवादिने सुद्धा त्यांचे उत्तर दाखल केले. मात्र तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने प्रकरण सुनावणीसाठी असताना तक्रार मागे घेतली.
याबाबत तक्रारदार यांची प्रकरणे दाखल करण्याची वाढती वृत्ती ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध घातक व त्रासदायक आहे. अर्जदाराच्या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर शास्ती लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला. अर्जदाराने एक जम्बो ऑक्सिजन सिलेंडर आर्वी उप जिल्हा रुग्णालयाला देण्याची शिक्षा त्यांनी सुनावली. अर्जदाराने एक महिन्याच्या आत जम्बो सिलेंडर न दिल्यास जम्बो सिलेंडर ची किंमत तहसीलदार यांनी जमीन महसूल म्हणून अर्जदाराकडून वसूल करून ती आपत्ती प्रतिसाद निधी या खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेत.
त्याचबरोबर जरी तक्रादाराने अर्ज मागे घेतला असला तरी ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले आहे किंवा नाही याबाबत शासकीय मोजणी करून गटविकास अधिकारी यांनी 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिलेत.