नियमित पाणीपुरवठ्याची केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, November 25, 2025

नियमित पाणीपुरवठ्याची केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही

 


                  नियमित पाणीपुरवठ्याची केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही

लोणार : “लोणार नगर पालिकेची सत्ता जनतेने आमच्या हातात दिल्यास शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू करू,” अशी ठाम ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. 

जाधव म्हणाले, “शहराच्या विकासासाठी शिवसेनेलाच सत्ता द्या. लोणार नगर पालिकेला निधी कमी पडू देणार नाही. देशभरात भाजप–शिंदे सेना एकजूट आहे, मात्र लोणारमध्ये भाजपाने एकला चलोची भूमिका घेतल्याने मतांचे विभाजन होऊ नये. भाजपाला मत म्हणजे काँग्रेसलाच मत असल्याने मतदारांनी सावध राहावे.”

केंद्रीय मंत्र्यांनी राज्य आणि केंद्रातील विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देत सांगितले की, 7 लाखांपर्यंत उपचारांसाठी कोणत्याही दाखल्याची गरज नसून 70 वर्षांवरील नागरिकांना योजनांचा स्वयंचलित लाभ मिळत आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत हजारो महिलांना थेट आर्थिक फायदा झाला असून 11 हजार घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. “आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार शहराच्या विकासासाठी वापरा,” असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार संजय रायमुलकर यांनी सध्याच्या आमदारांवर टीका करताना सांगितले, “नवीन काहीही काम मंजूर न करता आमच्या मंजूर केलेल्या कामांचेच उद्घाटन होत आहे. सत्ता मिळताच प्रलंबित सर्व विकासकामांना गती देऊ.”


शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी म्हणाले, “गेल्या 10 वर्षांत सत्ता नसूनही आम्ही लोकांसोबत राहिलो. आता सत्ता दिल्यास शहरातील रस्ते, नाल्या, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा प्रत्येक वॉर्डात अत्यंत दर्जेदार पद्धतीने उभारू.”


दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना प्रचार कार्यालयात पार पडली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संगीताताई संतोषराव मापारी यांच्यासह सर्व 10 प्रभागांतील उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


या बैठकीत केंद्रीय मंत्री जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले,

“लोणारच्या प्रगतीसाठी धनुष्यबाणावर बटन दाबा आणि शिवसेनेला भक्कम विजय द्या.”


Post Top Ad

-->