7 वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीत सर्वात जास्त घसरण
मुंबई, 12 ऑगस्ट : कोरोना लशीसंदर्भात (Coronavirus Vaccine) येणारा सकारात्मक बातम्यांनंतर जगभरातील शेअर बाजारात उसळी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात खरेदी वाढली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला असून दरात घसरण झाली आहे. वृत्तसंस्था Reuters च्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घसरल्या आहेत. या वृत्तसंस्थेच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीमध्ये सात वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरून 1921 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या आहेत.
सोन्याच्या किंमतीमध्ये तज्ज्ञांच्या मते यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमती देखील घसरू शकतात. सध्याच्या स्तरावर सोन्याचे दर 5 ते 8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने प्रति तोशा 1,317 रुपयांनी कमी झाले होते. तर एक किलोग्रॅम चांदीचे दर 2943 रुपयांनी घसरले होते.
सोन्याचे भाव का घसरले?
अमेरिकन शेअर बाजारात एका रात्रीत खरेदी वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा मोर्चा पुन्हा शेअर बाजाराकडे वळला आहे. बाजारांवर कोरोना लशीसंदर्भात येणाऱ्या सकारात्मक बातम्यांचा परिणाम झाला आहे. अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क इंडेक्स S&P 500 नवीन रेकॉर्ड स्तराच्या अत्यंत जवळ पोहोचला आहे.
आता काय होणार?
तज्ज्ञांच्या मते, सोन्याला नेहमी कठीण काळामध्ये झळाळी मिळते. 1970 च्या दशकात आलेल्या मंदीच्या काळात सोन्याच्या किंमती उच्च शिखरावर पोहोचल्या होत्या. त्याचप्रमाणे 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही अशीच काहीशी परिस्थिती होती. आकज्यांकडे लक्ष दिल्यास 80 च्या दशकात सोने सात पटींनी वाढून 850 डॉलर प्रति औंसच्या रेकॉर्ड स्तरावर होते.
2008 मध्ये जागतिक आर्थिक संकटाच्या काळात यामध्ये पुन्हा वाढ झाली, जे 2011 मध्ये 1900 डॉलरच्या पलीकडे पोहोचले होते. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात घसरण देखील झाली. त्यामुळे आता असे मानण्यात येत आहे की, जर कोरोना लस उपलब्ध झाली आणि ती पूर्णपणे सफल झाली तर सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरू शकतात.
भारतात स्वस्त होणार सोने?
तज्ज्ञांच्या मते जशा कोरोना व्हॅक्सिनसंदर्भात बातम्या येत जातील, तसे सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढू लागेल. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या किंमतीमध्ये 5 ते 8 टक्के घसरण होऊ शकते.