बोंडअळी निर्मुलन जनजागृती प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते शुभारंभ - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, August 20, 2020

बोंडअळी निर्मुलन जनजागृती प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते शुभारंभ

 बोंडअळी निर्मुलन जनजागृती प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते शुभारंभ


यवतमाळ, दि.20 : गुलाबी बोंड अळी निर्मुलनासाठी जनजागृती रथाला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व शेतकऱ्यांना बोंडअळीची माहिती घेऊन व शास्रज्ञांसोबत संवाद साधून आपल्या कापूस पिंकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

 याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुनिल महींद्रकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोगडे, राजेंद्र माळोदे, श्री. पाईकराव, श्री काळबांडे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 यवतमाळ जिल्ह्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र जास्त असल्यामुळे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून लौकीक आहे. राज्यात 2017 मध्ये गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कृषी विभाग व राशी सिड्स प्रा.लि. कोईम्बतुर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन फिरत्या प्रचार प्रसिद्धी रथाद्वारे सर्व 16 तालुक्यात गुलाबी बोंड अळी निर्मुलनासाठी प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. 

सोबतच शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपद्वारे प्रत्यक्ष विद्यापीठाचे व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे सोबत संपर्क साधून गुलाबी बोंड अळी व इतर किडींबाबत त्यांचा जीवनक्रम, नुकसानीची अवस्था, नुकसानीची तिव्रता, आर्थिक नुकसानीची पातळी व त्याचे निर्मूलन या संबंधाने शेतकऱ्यांना माहिती करून घेता येईल. 


कपाशीवरील बोंडअळीसाठी कृषी विभागाने सल्ला दिला आहे की, बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी कपाशीच्या लागवडीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी पाच कामगंध सापळे व गुलाबी बोंडअळीचे पंतग नष्ट करण्यासाठी कपाशीच्या शेतात हेक्टरी 40 सापळे लावावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी किंवा अझाडीरेक्टीने 1500 पीपीएम किंवा 3000 पिपीएम 50 मि.ली. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. आर्थिक नुकसानाची पातळी आठ पंतग प्रती सापळे सतत तीन दिवस कामगंध सापळ्यामध्ये आढळल्यास किंवा सरासरी 5 ते 10 टक्के पात्या, फुले किंवा हीरव्या बोंडाचे नुकसाण याप्रमाणे आढळून आल्यास खालीलप्रमाणे किटकनाशकाची फवारणी करावी.

 क्विनालफॉस 20 ए.एफ. 23 ते 25 ग्रॅम किंवा 40 मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस 50 इसी 30 मि.ली. किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यूपी 20 ग्रॅम किंवा लॅबडा सायहलोथ्रीन 5इसी 7.5 मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के इसी  20 मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकांची प्रती 10 लीटर पाण्यात फवारणी करावी. किटकनाशक फवारणी करतांना पाण्याचा सामू आम्लयुक्त (7 पेक्षा कमी) असावा. फवारणी शक्यतोवर वारा शांत असतांना सकाळी किंवा सायंकाळी करावी. फवारणी करतांना विषबाधा टाळण्यासाठी सेप्टी किटचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

Post Top Ad

-->