कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये कोविड रूग्णांसाठी प्लाझ्मा संग्रहण सुरू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, August 20, 2020

कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये कोविड रूग्णांसाठी प्लाझ्मा संग्रहण सुरू

 कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये  कोविड रूग्णांसाठी प्लाझ्मा संग्रहण सुरू


नागपूर विभागात नागपूर नंतरचा वर्धा दुसरा जिल्हा


 वर्धा, दि 20 (जिमाका):-  सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची  ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने आजपासून  कोविड प्लाझ्मा संकलन सुरू केले आहे.  कोविड -१९ संसर्गातुन  मुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये रक्तात अँटीबॉडी तयार होत असतात, ज्या कोरोना  विषाणूंविरूद्ध लढायला मदत करतात.  कोरोना विषाणू संसर्गग्रस्त  रूग्णांमध्ये बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि रुग्ण कोरोनातून लवकर बरा होतो. या सुविधेमुळे कोरोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार असून अशी सुविधा उपलब्ध असलेला वर्धा हा नागपूर विभागातील दुसरा जिल्हा आहे. 

 कोरोनातून बरे झालेले उपजिल्हाधिकारी  मनोज खैरनार हे प्रथम प्लाझ्मा दाता होते. तसेच कोविड संसर्गापासून बरे झालेले  सुधांशु डूकरे, यांनीही प्लाझ्मा दान केले.

  जिल्हाधिकारी  विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत प्लाझ्मा दान करण्यास सुरुवात झाली.  यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले   उपस्थितीत होते. कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त  पी.एल. तापडिया, कस्तूरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्रामचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग, एम.जी.आय.एम.एस सेवाग्रामचे डीन डॉ. नितीन गंगणे, पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापक व प्रमुख डॉ. अनुपमा गुप्ता, ब्लड बॅंकेचे प्राध्यापक व प्रभारी व्ही.बी. शिवकुमार उपस्थित होते.

 

 रुग्णालयातून  सुटी  झाल्यावर 28 दिवसांच्या कालावधी नंतर कोविड आजारातून बरे झालेल्या  व्यक्ती  प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत. प्लाझ्मा दान करण्यासाठी  सुमारे  45-60 मिनिटे लागतात. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.  एमजीआयएमएस सेवाग्राम व कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये  कोविड संसर्गाचे निदान व उपचारासाठी सर्व आवश्यक सुविधा सोबतचआता प्लाझ्मा उपचारही उपलब्ध  आहे.

Post Top Ad

-->