भंडारा शहरातही होणार अँटीजेन तपासणी - जिल्हाधिकारी संदीप कदम - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, August 25, 2020

भंडारा शहरातही होणार अँटीजेन तपासणी - जिल्हाधिकारी संदीप कदम


  जिल्हाधिकारी यांनी केली सिक्स मिनीट वॉक टेस्ट

 प्रत्येक दुकानात तपासणी करणार

 व्यापारी संघटना, मेडिकल असोशिएशन यांनी सहकार्य करावे

 ग्रामस्तरावर सरपंचाच्या मार्गदर्शनात तपासणी

 नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

 होम क्वारंटाईन करण्याची प्रक्रीया लवकरच

 कोविड सेंटरबाबत अफवा पसरवू नका

        भंडारा दि. 25 (जिमाका) भंडारा शहरात लवकरच   अँटीजेन तपासणीची सुविधा उपलब्ध  करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी तीन तपासणी केंद्र कार्यान्वित करुन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. व्यापारी तसेच नागरिकांनी कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वयंपूर्तीने तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.    

नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी व्हिडिओ काँफरन्सद्वारे विभागाचा आढावा घेतला या कोरोना प्रार्दुभावाचा सद्यस्थितीत केलेल्या कार्यवाहीबाबत सर्व जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या  काँन्सफरन्समध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथूरकर, डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते.

  यावेळी जिल्हाधिकारी यांनी सिक्स मिनीट वॉक टेस्ट, व्यापार संघटनेला दुकानात प्रत्यक्ष तपासणी तसेच आंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सुध्दा अँटीजेन तपासणी करुन घेण्याच्या सूचना दिल्या. गावात सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. मोबाईल व्हॅनद्वारे बाजारपेठेच्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी, असे ते म्हणाले. शहरात मुस्लीम लॉयब्ररी चौक, गांधी शाळा, राजीव गांधी चौकात गणेश विद्यालय तसेच दसरा मैदान येथे तपासणी केंद्र कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. नगर परिषद मुख्याधिकारी यांना विचारणा करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. शहरातील प्रत्येक दुकानात जावून ही तपासणी करण्यात येणार आहे.

    यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी संदीप कदम व मुख्याधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रत्यक्ष पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करुन सिक्स मिनीट वॉक टेस्ट मध्ये सहभाग घेतला. कोरोनाला न घाबरता प्रत्येक नागरिकांनी तपासणी करणे आवश्यक असल्याचा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सिक्स मिनीट वाक टेस्ट करून जिल्हातील नागरिकांना दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच डॉक्टर्स उपस्थित होते.

कोरोना हा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, घसा खवखव करणे व तोंडाची चव जाणे अशी लक्षण आढळताच तात्काळ स्वयंपूर्तीने तपासणी करून घ्या. तपासणीला उशीर करू नका असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हावासीयांना केले आहे. कोरोनाला घाबरू नका, आजार लपवू नका व ताप अंगावर काढू नका तपासणीसाठी पुढे या, असेही ते म्हणाले.


  लवकरच कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टराची मोबाईलद्वारे सेवा देण्यात येऊन घरीच त्यांना औषधांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जनेतेनी सकारत्मक भावना ठेवून कोविड सेंटरमध्ये मिळणाऱ्या सेवेची जनजागृती करावी. विनाकारण लोकांमध्ये भिती निर्माण होईल अशा पोस्ट मोबाईल, व्हॉट्सॲप व फेसबुकद्वारे परवू नका, असे जिल्हाधिकारी म्हणाले. सकारात्मक प्रतिसादाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. अफवा पसरवू नका, असे त्यांनी सांगितले.


डॉक्टर्स संघटनेशी चर्चा

जिल्हाधिकारी यांनी डॉक्टर्स संघटनेशी चर्चा करुन कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीत सहभागी होण्याचे आवाहन केले. होम क्वारंटाईन मध्ये राहण्याची व्यक्तीची इच्छा असेल तरच त्यांना गृह विलगीकरणात ठेवा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. रुग्णास होम क्वारंटाईनमध्ये सर्व औषध देण्यात येईल. तसेच डॉक्टर मोबाईलद्वारे त्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहेत. घरी रुग्णांना पल्स ऑक्सीमीटर देण्यात येईल व थर्मामिटर घरी असणे आवश्यक राहणार आहे, असे ते म्हणाले. रुगणसंख्या वाढल्यास सिस्टीम तयार करुन ही सेवा देण्यात येईल. यासाठी आयएमएच्या डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात येईल.. लवकरच ही सेवा प्रत्यक्षात आणण्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. .

व्यापारी संघटनेशी बैठक

  शहरातील व्यापारी संघटनेशी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. यावेळी  नगर प्रशासन अधिकारी पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी नियोजित अँटिजेन टेस्टसाठी व्यापारी संघटनेनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. व्यापारी संघटनेने सकारात्मक आश्वासन दिले. शहरातील वाढता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व दुकाने 9 ते 5 वाजेपर्यंत सुरु राहणार असून रविवारी सर्व दुकाने म्हणजेच कपडा दुकान, भाजीपाला,मोबाईल दुकाने आदी सर्व बंद राहतील, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. रविवारी दुकाने सुरु करण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली असता त्यावर विचार विमर्श करुन तोडगा काढण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. योग्य त्या उपाययोजना लवकरच राबविण्यात येईल, असे ते म्हणाले. मेडिकल असोसिएशनसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

  भंडारा जिल्ह्यात कोरोना आटोक्यात ठेवण्यासोबतच मृत्यू संख्या कमी करण्यावर प्रशासनाचा भर असून यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधकाऱ्यांनी सांगितले.

आपले जीवन अमूल्य असून प्रशासन आपल्या आरोग्यासाठी सतर्क आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून लक्षण जाणवताच स्वतः हुन तपासणी करून घ्यावी, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी नागरिकांना केले आहे.

            यासोबतच नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेऊन वावरावे. वारंवार साबणाने हात धुवून स्वच्छ करावे. आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य महत्वाचे आहे. आपल्या कुटुंबात तसेच परिचयातील कुठल्याही व्यक्तीला लक्षण आढळून आल्यास तात्काळ तपासणी करा. तपासणी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याचे जिल्हाधकाऱ्यांनी नमूद केले. कोरोनामुक्त भंडारा ठेवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Post Top Ad

-->