बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जागतिक कोविड 19 या साथरोगाचे प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 पर्यंत गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने, घरच्या घरी साजरा करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळांना परवानगी देण्यात येवू नये, असा निर्णय जिल्हा शांतता समितीच्या 20 जुलै रोजी आयोजित बैठकीत घेण्यात आला. तसेच श्रींच्या आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येवू नये असे निर्देशही देण्यात आले. तरी नागरीकांनी 1 सप्टेंबर रोजी होणारे श्रींचे विसर्जन घरच्या घरी करावे. कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
श्रीगणेश मूर्ती शाळू मातीची किंवा पर्यावरण पूरक असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा पुढील वर्षी भाद्रपद महिन्यात विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनावेळी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटूंबीयांचे कोरोना साथरोगापासून रक्षण करता येईल. श्रींच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नये. विसर्जनावेळी पारंपारिक पद्धतीने होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वृद्ध नागरिकांनी सुरक्षीततेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये. संपूर्ण उत्सवादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल लावणे व वारंवार स्वच्छ हात धुणे या नियमांचे पालन करावे. तसेच विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी कमीत कमी नागरिकांनी थांबण्याचे निर्देश असून ते पाळावे, असे आवाहनही अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.