नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावे- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 21, 2020

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावे- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश


बुलडाणा, (जिमाका)  दि. 21: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी जिल्ह्यातील महसूल, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी  दिले आहे.

नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, कृषी व महसूल यंत्रणेने गाव पातळीवरील आपली यंत्रणा सजग करावी.  प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये. त्याचप्रमाणे शेड नेट नुकसान, विहीर खचने, शेत खरडून जाणे, नाल्याचे पाणी शेतात घुसने आदी नुकसानीचा सुद्धा पंचनामा करावा. पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची कार्यवाही करावी. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात, कृषी सहायक यांना नुकसानीची माहिती द्यावी. पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी दिले आहे.

विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानीची माहिती संबधित कृषी विभाग व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 378.9 मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाची सरासरी 29.1 मिमी. आहे. सर्वात जास्त सिंदखेड राजा तालुक्यात 69.6 मिमी पावसाची नोंद झाली असून ही अतिवृष्टी आहे.

Post Top Ad

-->