तीन स्वयंसेवकाना ही लस शनिवारी दिली जाणार आहे
मुंबई : केईएम रुग्णालयातील करोनावरील ऑक्सफर्ड लशीच्या वैद्यकीय चाचण्यांना वेग आला असून शहरातील तीन स्वयंसेवकाना ही लस शनिवारी दिली जाणार आहे. लस देण्यासाठी आतापर्यंत १३ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या कोविडशील्ड या लशीच्या वैद्यकीय चाचण्या मुंबईत होणार आहेत. एथिक्स समितीने परवानगी दिल्यानंतर केईएममध्ये चार स्वयंसेवकांची निवड केली असून यातील तीन जणांना शनिवारी लस टोचली जाईल. आरटीपीसआर, प्रतिजन चाचण्यांमध्ये हे करोनाबधित न झाल्याची खात्री केली आहे. नियमानुसार चौथ्या स्वयंसेवकाला प्लासीबो दिले जाईल. शुक्रवारी आणखी १० जणांची तपासणी केली आहे. तर शनिवारी १० जणांना बोलावले असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.