जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्विकारली
गोंदिया दि.२८(जिमाका) : ग्रामीण विकासात जिल्हा परिषदेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. गोंदियासारख्या दुर्गम,आदिवासी बहूल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत विकासाला प्राधान्य देतांना लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण,विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.
श्री.डांगे पुढे म्हणाले,जिल्ह्याच्या विकासाला गती देतांना अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यात येईल. प्रशासकीय सुधारणा करताना वक्तशीरपणा यावर आपला भर राहणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे.या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतांना त्यांचे कौशल्य विकसित करण्याकडे आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री डांगे यांचा अल्प परिचय
श्री प्रदिपकुमार डांगे यांची निवड १९९५ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाकडून थेट उपजिल्हाधिकारी या पदावर झाली. श्री डांगे यांनी साकोली जिल्हा भंडारा, ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी (महसूल) म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर,अतिरिक्त जिल्हाधिकारी भंडारा, उपायुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, उपायुक्त (मनोरंजन कर ) भंडारा आणि गोंदिया येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष, नागपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण संस्था (महाज्योती) येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. ३ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने त्यांची पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत निवड केल्यानंतर राज्य शासनाने त्यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.