दमन आणि दीवचे खासदार मोहन देलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे. मरीन ड्राईव्ह भागातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 'एएनआय'ने याबाबत वृत्त दिले आहे.
हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्राथमिक तपासामध्ये खासदार मोहन देलकर यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला गेला असून पोलिसांनी यास दुजोरा दिलेला नाही. पोलीस सर्वच अनुषंगाने तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोटही मिळाल्याचे वृत्त आहे.
मोहन देलकर हे दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार होते. ते 58 वर्षांचे होते. 1989 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय नवशक्ती पक्षाची स्थापना केली होती. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती.