(छायाचित्रे संग्रहित)
नागपूर, 27 मार्च : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये बनावट चलनी नोटा छापणाऱ्या टोळीचा (fake currency notes printing) नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागपूरमधील गणेश पेठ पोलिसांनी सापळा रचून संबंधित सराईत आरोपींच्या मुसक्या (Accused arrest) आवळल्या आहे. 19 मार्च रोजी पहाटे 3 च्या सुमारास काही लोकं बनावट नोटा विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गणेश पेठ पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून 100 रुपयांच्या 102 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आरोपींनी यापूर्वी लाखो रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आणल्या असल्याचा संशय पोलिसांना आहे.
याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावं जावेद हुसेन आणि समीर शेख असून त्यांचा जुन्या कार खरेदी -विक्रीचा व्यावसाय आहे. तसंच आरोपी जावेद हुसेन हा सराईत गुन्हेगार असून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा करण्याबाबतचा गुन्हाही त्याच्या नावे दाखल आहे. बनावट नोटा चलनात आणणारी संबंधित टोळी गेल्या काही महिन्यांपासून नागपूर परिसरात सक्रिय असून दरम्यानच्या काळात त्यांनी लाखो रुपये किंमतीच्या बनावट नोटा बाजारात आणल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
19 मार्चला पहाटे 3 च्या सुमारास ही टोळी बनावट नोटा विकण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गणेश पेठ पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या 102 बनावट नोटा, मोबाईल, आणि कारसह 8 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतर चार आरोपींची नावंही सांगितली आहे.
हे चोरटे नियोजन पद्धतीने बनावट चलनी नोटा बाजारात आणत होते. पोलिसांनी यांच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटरही जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.