(छायाचित्रे संग्रहित )
नागपूर | राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार लाॅकडाऊन बाबतीत कडक पाऊलं उचलताना दिसत आहे. तर या लाॅकडाऊनला लसीकरण हा एकमेव पर्यायी उपाय सध्या आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज प्रत्येक राज्याला आहे. नुकताच लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असताना लसीचा तुटवडा जाणवत असल्याची बाब समोर आली आहे.
नागपूर मनपाकडे पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे लसीच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना त्या तुलनेत आता लसीचा साठा उपलब्ध होत नाही. सध्याच्या परिस्थितीत नागपूर मनपाकडे 18 ते 20 हजार कोरोना डोस शिल्लक आहेत. शहरात दररोज 10 हजारच्या आसपास डोस लागतात. त्यामुळे पुढील दोन दिवस पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे.
नागपूर महापालिकने राज्य सरकारकडे अडीच लाख डोसची मागणी केली आहे. नागपूरमध्ये दररोज हजारांच्यावर कोरोना रूग्ण सापडत आहेत. राज्य सरकारने हे डोस दिल्यानंतर लसीकरणाला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे. नागपूर बरोबर संपुर्ण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा बिकट परिस्थिती येऊ शकते, असं सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. तर अमेरीकेत उत्पन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यास भारतसह अन्य देशातही लसीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असंही पुनावाला यांनी सांगितलं आहे.