(छायाचित्रे संग्रहित )
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या अर्थसंकल्पीय ऑनलाईन बैठकीचे मंगळवार ९ मार्चला आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेतील तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि प्रशासनाच्या कामावर सदस्यांची नाराजी असून अशा विविध प्रश्नांवरून ही बैठक गाजणार आहे.
नागपूर विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये अक्षम्य चुका झाल्या. त्यामुळे विद्यापीठाच्या निकालावर प्रचंड परिणाम झाल्याने अनेकांना प्रवेशापासूनही वंचित राहावे
लागले. त्यामुळे विधिसभेच्या बैठकीत हा विषय गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय विद्यापीठामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये एका विशिष्ट वर्गाचे वर्चस्व निर्माण झाल्यानेही त्याला विरोध होत आहे. त्यामुळे असे अनेक विषय गाजणार आहेत. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना प्रचंड उशीर झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. त्यामुळे यावरही विद्यापीठाला घेरण्याची रणनीती आखण्यात आल्याचे काही सदस्यांनी सांगितले.