४८ तासांत १०९ रुग्णांचे मृत्यू
(छायाचित्रे संग्रहित)
नागपूर : जिल्ह्य़ात सोमवारी ५५ तर मंगळवारी ५४ असे ४८ तासांत एकूण १०९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंतची जिल्ह्य़ातील करोना बळींची संख्या पाच हजार पार गेली आहे. याशिवाय ४८ तासांत जिल्ह्य़ात ४ हजार ३३३ नवीन रुग्ण आढळले. विशेष म्हणजे, होळीमुळे चाचण्या कमी झाल्या.
जिल्ह्य़ात २९ आणि ३० मार्च अशा दोन दिवसांत दगावलेल्यांमध्ये शहरातील ६२, ग्रामीण ४०, जिल्ह्य़ाबाहेरील ७ अशा एकूण १०९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार २१५, ग्रामीण ९७५, जिल्ह्य़ाबाहेरील ८५० अशी एकूण ५ हजार ४० रुग्णांवर पोहचली आहे. दोन दिवसांत शहरात २ हजार ९१६, ग्रामीण १ हजार ४१०, जिल्ह्य़ाबाहेरील ७ असे एकूण ४ हजार ३३३ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या १ लाख ७५ हजार ६७६, ग्रामीण ४६ हजार ४४५, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३२ अशी एकूण २ लाख २३ हजार १५३ रुग्णांवर पोहचली आहे. दोन दिवसांत शहरात २ हजार ६२७, ग्रामीण १ हजार १६४ असे एकूण ३ हजार ७९१ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ४५ हजार ३३७, ग्रामीण ३४ हजार ५६७ अशी एकूण १ लाख ७९ हजार ४ व्यक्तींवर पोहोचली आहे. त्यामुळे करोनामुक्तांचे प्रमाण जिल्ह्य़ात ८०.६२ टक्के आहे.
दोन दिवसांत केवळ १६,६७३ चाचण्या
होळी व धूलिवंदनामुळे शहरात दोन दिवसांत केवळ १२ हजार ७८८, ग्रामीण ३ हजार ८८५ अशा एकूण १६ हजार ६७३ चाचण्या झाल्या. त्यात २९ मार्चच्या १२ हजार ८९ तर ३० मार्चच्या केवळ ४ हजार ६०४ चाचण्यांचा समावेश होता. मंगळवारी दुपापर्यंत चाचण्यांची संख्या खूपच कमी नोंदवली गेली.
‘करोना नियंत्रण कक्ष बिनकामाचा’
नागपूर : महापालिकेच्या करोना नियंत्रण कक्षाबाबत जनमानसात कमालीची नाराजी आहे. येथे सरकारी व खासगी रुग्णालयातील खाटांची माहिती योग्यप्रकारे दिली जात नाही, त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी शहरभर फिरावे लागत आहे, त्यामुळे हा कक्ष बिनकामाचा ठरला आहे, अशी तक्रार माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. रुग्णांचे नातेवाईक सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयातील उपलब्ध खाटांबाबत कक्षाकडे विचारणा करतात तेव्हा त्यांना एकतर चुकीची माहिती दिली जाते किंवा माहितीच दिली जात नाही, असे आर्य यांचे म्हणणे आहे. रेमडिसीवर हे इंजेक्शन बाजारात १२५० रुपयात मिळते, मात्र खासगी रुग्णालयात त्यासाठी चार ते पाच हजार रुपये आकारले जाते. इंजेक्शन टोचण्याचे एक हजार रुपये घेतले जात आहे. याबाबत तक्रार कुठे करायची ही माहिती सुद्धा दिली जात नाही. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांची लूट थांबवावी, अशी मागणी आर्य यांनी केली आहे.
रुग्णालयांतील रुग्णसंख्या ५ हजारांच्या उंबरठय़ावर
एकीकडे जिल्ह्य़ातील नावाजलेल्या खासगी रुग्णालयांत नवीन रुग्णांना खाटा मिळत नसतानाच शासकीय रुग्णालयांतही गंभीर रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात २७ हजार ८५५, ग्रामीण १० हजार ३४३ असे एकूण ३८ हजार २०९ उपचाराधीन रुग्ण होते. त्यातील ४ हजार ९८० गंभीर रुग्णांवर विविध रुग्णालये वा कोविड केअर सेंटरमध्ये तर ३२ हजार ७३ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.