कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन खाजगी प्रवासी बस घेतल्या ताब्यात
• वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कारवाई
वाशिम, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रवासी वाहतुकीसाठी सुद्धा नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाजगी प्रवासी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते, तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हाटसअप क्रमांकावर प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अकोला-शेलूबाजार मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खाजगी बस उप प्रादेशिक परिवहन विभागाने १८ एप्रिल रोजी ताब्यात घेतल्या आहेत.
संचारबंदी काळात वैध कारणासाठी प्रवासी वाहतूक सुरु राहणार असून ऑटोरिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये (चारचाकी) चालक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी, बसमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेएवढे प्रवासी घेण्यास मुभा आहे, मात्र उभा राहून प्रवास करण्यास मनाई आहे. प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाने योग्यरित्या मास्क परिधान केलेला केलेला असणे बंधनकारक आहे. चारचाकी टॅक्सीमध्ये एखाद्या व्यक्तीने व्यवस्थितरित्या मास्क परिधान केला नसेल अशावेळी प्रवाशांसह चालकाविरुद्धही दंड आकारण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी ९८५०८७३२८७ किंवा ९९२३३१७९०९ या व्हाटसअप क्रमांकावर सदर वाहनाचा क्रमांक दिसेल असे छायाचित्र काढून पाठविण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन विभागाने केले होते.
शेलूबाजार-अकोला मार्गावर वाहतूक करणाऱ्या दोन खाजगी प्रवासी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात असून कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची छायाचित्रे उप प्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूने सदर दोन बसेस अकोला येथून ताब्यात घेतल्या असून संबंधित मालकांविरुद्ध पुढील कार्यवाही सुरु केली असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी सांगितले. तसेच परवानगी नसलेल्या खाजगी प्रवासी बसेस, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी, परवाना नसलेल्या ऑटोरिक्षा, परवाना नसलेली खाजगी प्रवासी वाहने, अवैध प्रवासी वाहनांमध्ये नागरिकांनी प्रवास करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईची मोहीम यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत ७२ ऑटोरिक्षा, ७५ खाजगी प्रवासी वाहने व ३७ इतर वाहनांकडून ६९ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.