मेहकर मालेगाव महामार्गावर जागोजागी खड्डे: वाहनधारक त्रस्त, संबंधीत विभागाप्रती प्रचंड रोष
बुलढाणा डोणगाव, मेहकर मालेगाव हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावर 24 तास प्रचंड वाहतुकीची वर्दळ राहते. राष्ट्रीय महामार्ग असतानाही या महामार्गावर जागोजागी प्रचंड मोठे खड्डे पडल्याने हा राष्ट्रीय महामार्ग की पाणंद रस्ता असा प्रश्न निर्माण वाहनधारक उपस्थित करीत आहेत. या महामार्गावरील खड्डे बुजवण्याची तसदी संबंधित अधिकारी घेत नसल्याने वाहनधारकांमध्ये मात्र प्रचंड रोष व्यक्त केला जात असून याकडे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देऊन सदर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश द्यावे, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. दैनिक आपला विदर्भ ई पेपर 27 सप्टेंबर 2024
मेहकर ते मालेगाव या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तब्बल 20 कोटीचा निधी खर्च करूनही काम करण्यात आले आहे. मात्र अवघ्या दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाला खड्ड्याने ग्रासले आहे. महामार्गाची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली असून याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्यांचे व वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढल्याने नागरिकही नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकी धारकांना तारेवर कसरत करून वाहन चालवावी लागत आहेत.तर या खड्ड्यामुळे दरदिवशी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वारंवार मागणी करूनही याकडे संबंधीत विभागाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. डोणगाव हे वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने या ठिकाणाहून अकोला, वाशिम, जालना, छत्रपती शिवाजी नगर आदी ठिकाणी जाण्यासाठी 24 तास वाहनधारकांची वर्दळ असते. पावसाळ्यात पडलेले खड्डे आता दिवसेंदिवस वाढत असून सदर खड्डे हे दोन ते तीन फूट रुंद झाले आहेत. तर एक फुटाच्या जवळपास खोल झालेले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ विभागाने व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
20 कोटी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह मेहकर ते मालेगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या महामार्गासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या 20 कोटी रुपयांच्या निधीतून मेहकर ते मालेगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले. त्यावेळेस अधिकारी व लोकप्रतिनिधीकडून मिळालेल्या माहिती आधारे मेहकर ते मालेगाव या रोडवर खड्डे बुजून थ्री लियर टाकण्यात येणार असल्याची समजले होते. यासाठी 20 कोटी रुपयांचा निधीतून कामही करण्यात आले. मात्र 2022 ते 2024 पर्यंतच्या अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत या रस्त्याची पुरती वाट लागली असून महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे 20 कोटी रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेल्या कामाच्या दर्जावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे मात्र वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याने हा सर्व मनमानी कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक संघटनांचे आंदोलन राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मेहकर ते मालेगाव या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. तर खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जखमींना प्राथमिक उपचाराचा खर्च हा अधिकाऱ्याकडून वसूल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती. तर या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अनेक संघटनाने पुढाकार घेत रास्तारोको आंदोलन केले होते. हा सर्व खटाटोप झाल्यानंतर मेहकर ते मालेगाव या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती मात्र जैसे तेच आहे. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे बुजवल्या जाणार की नाहीत असा प्रश्न निर्माण होतो असून खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ नागरिकावर येते की काय अशी चर्चा होत आहे.
मेहकर ते मालेगाव या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यामुळे दर दिवशी दुचाकी धारक तसेच इतर मोठ्या वाहनांच्या अपघात घडत आहेत. या महामार्गावर डोणगाव डोणगाव नजीक वाटिका हॉटेल समोर प्रचंड मोठा खड्डा निर्माण झाल्याने या खड्ड्यात दुचाकी वाहनाबरोबर इतर चार चाकी वाहनाचे सुद्धा अपघात घडले आहेत. नुकताच या खड्ड्यात दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीधारक गंभीर जखमी झाला होता. तसेच गाडीचे सुद्धा मोठे नुकसान झाले होते. दर दिवशी अपघात घडत असताना याकडे मात्र अधिकाऱ्यांचा प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनधारकासह नागरिकांमध्ये संबंधित विभागाच्या अधिकारी व लोकप्रतिनिधी बद्दल तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.