जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, May 21, 2026

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये

 

नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन

बुलढाणा, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधन तुटवड्याच्या अफवामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गर्दी होत असून अनावश्यक इंधन साठा जमा करताना दिसून येत आहे.  जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप धारकांच्या सतत संपर्कात आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचे वाटप सुरळीत व्हावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.


Post Top Ad

-->