यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदी कायम - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, July 31, 2020

यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदी कायम


यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस येथील संचारबंदी कायम

यवतमाळ, दि. 31 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात 31 जुलैपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वरील आदेश निर्गमित केले आहे.

संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबींना मुभा देण्यात आली आहे. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मुभा राहील. एका ठिकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्रीला सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री या बाबीस सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत मुभा राहील. पेट्रोल, डिझेल पंप सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच अत्यावश्यक सेवेकरिता 24 तास सुरू राहील.  कृषी साहित्याची, रासायनिक खत विक्री, बि-बियाणे विक्री व त्यांची गोदामे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजतापर्यंत सुरू राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. 

यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतच्या भागातील सर्व बँका ग्राहकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुभा राहील व शासकीय कामाकरिता व त्यांचे बँकीग कामे त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार सुरू राहतील. अंत्यविधी प्रक्रीया पार पाडण्यास पुर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार 20 लोकांची मुभा राहील. सर्व दारूची दुकाने बंद राहतील. मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपुर्णत: बंद राहतील. केवळ नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय राहील. 
यवतमाळ, दारव्हा, पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. जार वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. क्रीडा कॉम्पलेक्स आणि स्टेडियम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तिक व्यायामाकरीता, मॉर्निंग वॉक, सायकलिंगकरीता मुभा राहील. सीएससी, व्हिएलई केंद्र सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत आली आहे.

तसेच यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतचा भाग वगळता उर्वरित ग्रामीण भागात व जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात सर्व अत्यावश्यक सेवा व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने 14 जुलै 2020 च्या आदेशातील सकाळी 10 ते 2 या वेळेऐवजी आता सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. येथील दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते सायंकाळी 5 तसेच सायंकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच विक्री करता येईल. 

उपरोक्त आदेश जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रास लागू राहणार नाहीत. सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता यातील व इतर संबंधीत कायदे व नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

Post Top Ad

-->