भंडारा - कोरोना हा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, घसा खवखव करणे व तोंडाची चव जाणे अशी लक्षण आढळताच तात्काळ तपासणी करून घ्या. तपासणीला उशीर करू नका असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हावासीयांना केले आहे. कोरोनाला घाबरू नका, आजार लपवू नका व ताप अंगावर काढू नका तपासणीसाठी पुढे या.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोविड १९ साथरोग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र लक्षण असतांना सुद्धा नागरिक तपासणीसाठी पुढे येण्यास टाळाटाळ करतात. ही बाबा आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. तपासणीला उशीर केल्यास आजार बळावतो. विशेषतः पन्नास वर्षावरील व्यक्तीसाठी धोका अधिक वाढतो. तपासणी उशीरा केल्यामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण असून पहिल्या टप्प्यातच तपासणी केल्यास कोरोनाचा धोका वाढत नाही. मात्र नागरिक तपासणीसाठी पुढे येत नाहीत ही बाब धोका वाढवणारी आहे. कृपया असे न करता तपासणी करून घ्यावी, असे ते म्हणाले. भंडारा जिल्ह्यात कोरोना आटोक्यात ठेवण्यासोबतच मृत्यू संख्या कमी करण्यावर प्रशासनाचा भर असून यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधकाऱ्यांनी सांगितले.
आपले जीवन अमूल्य असून प्रशासन आपल्या आरोग्यासाठी सतर्क आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून लक्षण जाणवताच स्वतः हुन तपासणी करून घ्यावी, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी नागरिकांना केले आहे.
तापासरखी लक्षण आढळून आल्यास घरच्या घरी औषध घेण्याचे कृपया टाळावे असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, अशाने आजार बळावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जिल्ह्यात शासनाकडून अँटीजेन व कोरोना तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी मनात भीती न बाळगता आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, जेणेकरून संभाव्य धोका टाळता येऊ शकेल.
यासोबतच नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेऊन वावरावे. वारंवार साबणाने हात धुवून स्वच्छ करावे. आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य महत्वाचे आहे. आपल्या कुटुंबात तसेच परिचयातील कुठल्याही व्यक्तीला लक्षण आढळून आल्यास तात्काळ तपासणी करा. तपासणी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याचे जिल्हाधकाऱ्यांनी नमूद केले. कोरोनामुक्त भंडारा ठेवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.