दसऱ्यानिमित्त सजली बाजारपेठ; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, October 24, 2020

दसऱ्यानिमित्त सजली बाजारपेठ; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी


जळगाव -
 कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प असलेल्या जळगावच्या बाजारपेठेत दसऱ्याच्यानिमित्त चैतन्य निर्माण झाले आहे. दसऱ्याच्या स्वागतासाठी येथील बाजारपेठ सजली आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच गृहपयोगी साधनांच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दसर्‍याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो, त्यामुळे बाजारपेठेत सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच कपड्यांची मोठ्याप्रमाणात खरेदी होत असते. त्यमुळे कपडा मार्केट, सराफा बाजार आणि एलइडी, एलसीडी, फ्रीज, वॉशिंग मशिन, मायक्रो ओव्हन, लॅपटॉप, मोबाइल, फ्युरिफायर यासह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीची लगबग सुरू आहे. शहरातील नवीपेठ, नेहरु चौक, शिवाजी स्टेडियम या परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. नवरात्रोत्सवासह दसर्‍याला पूजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. त्यामुळे बाजारपेठेत शनिवारी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली होती. सकाळपासूनच बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची खरेदी करताना ग्राहक नजरेस पडत आहे. शहरातील गोलाणी मार्केटसह मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष चौक, बळीराम पेठ, नवीपेठेत झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. एकंदरीतच दसऱ्यासाठी संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली असून ग्राहकांची रेलचेलसुद्धा वाढली आहे.

Post Top Ad

-->