· सोयाबीन प्रती क्विंटल 3880 रूपये हमीभाव
· मूग व उडीदाच्या शासकीय खरेदीला प्रारंभ
· शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेतंर्गत खरीप हंगाम 2020-21 साठी सोयाबीन शेतमालाच्या शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी 1 ऑक्टोंबरपासून सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल 3880 रूपये हमी भाव असून नाफेडच्यावतीने मार्केटींग फेडरेशन जिल्ह्यामध्ये सोयाबीनची खरेदी करणार आहे. जिल्ह्यामध्ये तालुका खरेदी विक्री संघ दे. राजा, लोणार, मेहकर, शेगांव, संग्रामपूर, बुलडाणा येथे सोयाबीनची शासकीय खरेदी करण्यात येणार आहे.
तसेच मोताळा येथे संत गजानन कृषि उत्पादक कंपनी, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथे सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ कृषि विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड ता. दे. राजा खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांची शेती ज्या तालुक्यांमध्ये आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती असलेल्या तालुक्यातीलच खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जावे. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोंबर पासून शासकीय मूग व उडीद शेतमालाच्या खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. उडीदाची खरेदी 6000 रूपये प्रति क्विंटल व मूगाची खरेदी 7196 रूपये प्रति क्विंटल आधारभूत किंमतीला सदर खरेदी केंद्रांवर करण्यात येत आहे. उडीद व मूग शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणीसुद्धा सुरू आहे. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेती असलेल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतमालाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
चालु हंगामातील 7/12 उतारा, पिकपेरा, खाते सुरू असलेले बँकेचे पासबुक झेरॉक्स (जनधन खाते, बंद खाते व कमी लिमीटचे खाते पासबुक झेरॉक्स देवू नये), आधार कार्ड प्रत, सुरू असलेला मोबाईल क्रमांक आदी.