दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा ४० बळी!(Coronavirus-Nagpur ) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, March 23, 2021

दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा ४० बळी!(Coronavirus-Nagpur )

 

(छायाचित्रे संग्रहित) 

नागपूर : जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून कधी तीन हजारावर तर कधी साडेतीन हजारावर करोनाबाधित आढळत आहेत. सोमवारी २४ तासांत तब्बल ४० बाधितांचा मृत्यू नोंदवला गेल्याने चिंता वाढली आहे. तर दिवसभरात ३ हजार ५९६ नवीन रुग्णांची भर पडली.

करोनाने दगावणाऱ्या रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २१, ग्रामीण १५, जिल्ह्य़ाबाहेरील ४ अशा एकूण ४० रुग्णांचा समावेश आहे. ही मृत्यूसंख्या गेल्या काही महिन्यातील जिल्ह्य़ातील सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ९८७, ग्रामीण ८५५, जिल्ह्य़ाबाहेरील ८२२ अशी एकूण ४ हजार ६६४ रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात शहरात २ हजार ६२५,

ग्रामीण ९६७, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण ३ हजार ५९६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या १ लाख ५६ हजार ४४८, ग्रामीण ३९ हजार २२४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४ अशी एकूण १ लाख ९६ हजार ६७६ रुग्णांवर पोहचली आहे. दरम्यान, गंभीर  रुग्ण वाढल्याने शहरातील खासगीसह सरकारी रुग्णालयांत खाटा पूर्णत: भरल्या असल्याचे चित्र आहे. सोमवारी मेडिकलमध्ये तब्बल ४२३, मेयो ४२५, एम्स ७०, लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह १५१ गंभीर संवर्गातील करोनाग्रस्त व मोठय़ा संख्येने संशयितही रुग्ण दाखल होते, विशेष.

चाचण्यांची संख्या पुन्हा कमी

जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने १५ हजारावर चाचणी होत असताना सोमवारी शहरात ९ हजार ४४२, ग्रामीण ३ हजार १८१ अशी एकूण १२ हजार ६२३ संशयित व्यक्तींचे नमुने घेतले गेले. त्याचा अहवाल मंगळवारी अपेक्षित असतानाच रविवारी घेतलेल्या १७ हजार १८२ नमुन्यांतील ३ हजार ५९६ व्यक्तींना करोना असल्याचे निदान झाले. हे सकारात्मक अहवालाचे प्रमाण २०.९२ टक्के होते.

शालिनीताई मेघे रुग्णालयासाठी डॉ. वासनिक नोडल अधिकारी

जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाल्याने हिंगणा रोडवरील शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये करोनाग्रस्त रुग्ण घेणे जवळपास बंद झाले होते. परंतु पुन्हा बाधितांची वाढती संख्या बघता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या रुग्णालयाला डेडिकेटेड कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. सोबत या रुग्णालयासाठी मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूरेश वासनिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेशही काढले आहे.

करोनामुक्तांची संख्या १.६० लाख पार

शहरात दिवसभरात १ हजार ५६४, ग्रामीण २७३ असे एकूण १ हजार ८३७ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ३० हजार ३०, ग्रामीण ३० हजार ९१५ अशी एकूण १ लाख ६० हजार ९४५ व्यक्तींवर पोहचली आहे. हे करोनामुक्तांचे प्रमाण ८१.८३ टक्के आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजारावर

शहरात २४ हजार १७३, ग्रामीण ६ हजार ८९४ असे एकूण ३१ हजार ६७ सक्रिय उपचाराधीन करोनाबाधित आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ३ हजार ७९९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर २३ हजार ६७२ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहे. तर नवीन रुग्णांवर उपचाराची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस दलात पुन्हा करोनाची दहशत ; आतापर्यंत २५८ कर्मचारी बाधित

नागपूर : शहर पोलीस दलात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोमवारी आणखी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. यात वाठोडा व सक्करदरा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, तहसील पोलीस ठाणे व पोलीस नियंत्रण कक्षातील प्रत्येकी एका पोलिसाचा समावेश आहे. आतापर्यंत २५८ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा लागण झाली असून, पाचपावली पोलीस ठाण्यातील कर्मचारी नवीनकुमार झा (४९) यांचा करोनामुळे मृत्यू झाला. रविवारी कळमना पोलीस ठाण्यातील दोन, एमआयडीसी, कोराडी, पोलीस मुख्यालय, यशोधरानगर, वाडी व पोलीस नियंत्रण कक्षातील प्रत्येकी एक कर्मचारी करोनाबाधित असल्याचे आढळले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यासाठी सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन पथके पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयात तैनात आहेत.

Post Top Ad

-->