करोनाग्रस्तांसाठी ४०० खाटा वाढवण्याच्या कामाला गती(Nagpur-Covid) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, March 23, 2021

करोनाग्रस्तांसाठी ४०० खाटा वाढवण्याच्या कामाला गती(Nagpur-Covid)

 

(छायाचित्रे संग्रहित) 

नागपूर : जिल्ह्य़ात गंभीर संवर्गातील करोना बाधित रुग्ण वाढल्याने खासगी वगळता शासकीय रुग्णालयांतही रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर सोमवारी मेडिकलला पोहचले. त्यांनी विविध विभागांची बैठक घेत तातडीने ४०० नवीन खाटांची व्यवस्था सुरू करण्याच्या कामाला गती दिली आहे.

योगेश कुंभेजकर यांनी याप्रसंगी मेडिकलमध्ये नव्याने खाटा वाढवल्यावर बाह्य़स्त्रोताचे किती कर्मचारी लागतील, जेवणासाठी किती खर्च येईल यासह इतर सर्व माहिती घेतली. त्यांना सुमारे २० लाख रुपयांचा महिन्याचा बाह्य़स्त्रोत व जेवणासाठीचा खर्च येणार असल्याचे स्पष्ट केले गेले.

सोबत मेडिकलकडून खाटा वाढवल्यावर येथे अतिरिक्त सुमारे ४० ते ५० वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सुमारे ३०० परिचारिकांचीही गरज भासणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी तातडीने योग्य कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले. तर तातीडने येथील ऑक्सिजन लाईनचे काम सुरू करण्यासह त्यांनी या वार्डाची प्रत्यक्ष पाहणीही केली. याप्रसंगी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह काही विभागांचे प्रमुख व पीडब्ल्यूडी व ऑक्सिजन लाईन टाकण्याचे काम असलेले अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कोविड वार्डातील तळमजल्यावरील ५० ते ९० खाटा सुरू करण्यावरही त्यांनी आढावा घेतला.

याबाबत मेडिकलकडून लवकरच न्यायालयात विनंती केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

अतिरिक्त १००० खाटांची व्यवस्था करा – महापौर

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच बाधितांची संख्याही वाढत चालली आहे. यामुळे सुमारे १००० अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला सोमवारी दिले. शहरात दररोज २५०० ते ३००० नागरिक करोनाबाधित होत आहेत. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या २४ हजारावर गेली आहे. आतापर्यंत ३००० च्या जवळपास नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. शहरातील नॉन कोविड हॉस्पिटल्सना कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. इंदिरा गांधी रुग्णालय (मेयो) मध्ये अतिरिक्त डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पाचपावली येथील स्त्री रुग्णालयमध्ये कोविड रुग्णांकरिता तळमजल्यावर व्यवस्था त्वरित सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Post Top Ad

-->