डॉक्टर - नर्स सोबत वाद घालणाऱ्यावर होणार कडक कारवाई- जिल्हाधिकारी CORONA TIME BHANDARA - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, April 19, 2021

डॉक्टर - नर्स सोबत वाद घालणाऱ्यावर होणार कडक कारवाई- जिल्हाधिकारी CORONA TIME BHANDARA

 

( छायाचित्र संग्रहित )
डॉक्टर - नर्स सोबत वाद घालणाऱ्यावर होणार कडक कारवाई- जिल्हाधिकारी

भंडारा-: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या पाहता वैद्यकीय यंत्रणेवर आधीच मोठ्या प्रमाणात ताण आहे. अशातच रुग्णांचे काही नातेवाईक डॉक्टर व नर्स यांच्यासोबत हुज्जत घालतात कधी कधी मारहाण सुद्धा करतात, ही बाब योग्य नसून अशा घटना घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिला आहे.
कोविड 19 साथरोगाचा हा काळ अत्यंत कठीण असून या काळात सर्व प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा लोकांना सेवा देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. रुग्ण संख्या वेगाने वाढत असून प्रत्येक रुग्ण हा महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध देखिल आहे. कोरोनाचे रुग्ण अचानक वाढत असल्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. डॉक्टर नर्स आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
या काळात अनेक डॉक्टर व नर्स पॉझिटिव्ह सुद्धा आले आहेत. ही बाब लक्षात घेता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी संयम बाळगून सहकार्य करणे अपेक्षित आहे. रुग्णांचे असंख्य नातेवाईक धीरोदात्तपणे सहकार्य करत आहेत. मात्र काही लोक डॉक्टर व नर्स यांच्यासोबत हुज्जत घालून कायदा हातात घेतात. ही बाब योग्य असून यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे.
वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता आहे त्या मनुष्यबळाच्या सहकार्याने अधिकाधिक उत्तम उपचार देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. असे असतांना रूग्णाच्या नातेवाईकांकडून उपचार पद्धतीत हस्तक्षेप, वादावादी, भांडण व मारहाण असे प्रकार होतांना दिसत आहेत. ही बाब गंभीर असून असे करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार आहेत, याची नोंद घ्यावी. यापूर्वी अशा घटनांमध्ये गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्यात आली आहे.
आपला व आपल्या कुटूंबियांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर व नर्स सोबत व्यवहार करतांना संयम ठेवणे आवश्यक आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची अगतिकता प्रशासन समजू शकते. मात्र उपलब्ध साधन सुचितेत उत्तम व तत्पर सेवा देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी मानवतेचा परिचय देत प्रशासनाला सहकार्य करावे व डॉक्टर आणि नर्सचे मनोबल वाढेल असेच आपले वर्तन ठेवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post Top Ad

-->