मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ६३ जणांवर गुन्हे दाखल
अकोला ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यांवर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर सुद्धा शनिवारी (ता. १७) पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी एकूण ६३ जणांवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे सकाळी तसेच संध्याकाळी विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
नियम तोडणाऱ्यांमध्ये तरूण अधिक
पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमध्ये तरुण मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पुढचे काही दिवस घरीच राहायला सांगावे. विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.