convid-19 भादोला येथे कोरोना आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, May 13, 2021

convid-19 भादोला येथे कोरोना आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

गावागावात लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभारा – जिल्हाधिकारी 

बुलडाणा, दि. १३ (प्रतिनिधी) -  प्रत्येक गावात स्वतंत्र आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे, अशी संकल्पना रविकांत तुपकर यांनी मांडली आणि त्यांच्या पुढाकाराने किन्होळा येथे लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले सुविधायुक्त कोरोना आयसोलेशन सेंटर सुरु झाले. किन्होळा पॅटर्नची चर्चा राज्यभर झाली आणि याच संकल्पनेतून बुलडाणा तालुक्यातील भादोला येथे गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर १३ मे रोजी कार्यान्वित झाले आहे. जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या हस्ते व रविकांत तुपकरांच्या प्रमुख उपस्थितीत या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. भादोला ग्रामस्थांचे कौतुक करत गावागावात लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभे करण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी केले. 

               सध्याची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. आता गावखेड्यांपर्यंत कोरोनाचे विध्वंसक रुप दिसून येत आहे. हजारो रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत तर शेकडोंनी प्राण गमावले आहेत. अनेकांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन - इंजेक्शन, औषधांचा तुटवडा आहे. अशावेळी एकमेकांना मदत करण्याची, आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे गावागावात आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे, लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले होते. तसेच या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील मागणी केली होती. सर्वप्रथम चिखली तालुक्यातील किन्होळा गावकऱ्यांनी लोकवर्गणी उभारून कोरोना आयसोलेशन सेंटर उभे केले. त्या पाठोपाठ भादोला येथील नागरिकांनी देखील पुढाकार घेतला व १३ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश राठोड, सरपंच प्रमोदअप्पा वाघमारे, उपसरपंच अमीन खाँसाब, ग्रा. पं. सदस्य मोहन सोनुने, वसंतराव निकम, विनोद चिंचोले, शेषराव मिसाळ, मल्हारी गवई, संजय काळे, हिरालाल जैन, ग्रामसेवक अविनाश मानकर, तलाठी श्री कुळकर्णी यांच्यासह नागरिक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, जि. प. शाळेचे शिक्षक उपस्थित होते. 


                   जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी यावेळी बोलतांना भादोला गावकऱ्यांचे व आयसोलेशन सेंटरच्या उपक्रमाचे कौतुक केले. भादोला येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून सुरु केलेले आयसोलेशन सेंटर हे रुग्णांना दिलासा देणारे ठरणार आहे. येथे नियमितपणे आरटीपीसीआर, रॅपिड चाचण्या करण्यासोबतच संशयीत व बाधितांवर उपचार केले जातील शिवाय लसीकरणावर देखील भर दिला जाईल. प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत या आयसोलेशन सेंटरला केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गावागावात तरुणांनी व गावकऱ्यांनी लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभे करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे सेंटर उभे झाले तरच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी होऊ शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. शिवराजे ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण आयसोलेशन सेंटरची साफसफाई करुन मोलाचे सहकार्य केले. 


                      यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, सध्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे केवळ प्रशासन आणि शासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता गावातील नागरिकांनी एकमेकांना आधार देण्यासाठी, मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे हे संकट परतवून लावण्यासाठी पक्ष, राजकारण, जात, धर्म अशा सर्वच बाबी बाजुला सारुन एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. भादोला येथील नागरिकांनी पुढाकार घेत आयसोलेशन सेंटर निर्माण करुन इतर गावांसमोर आदर्श ठेवला आहे. येथे आवश्यक ते उपचार मिळणार असून विलगीकरणात राहणाऱ्यांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासन आपल्या सोबतच आहेच मात्र नागरिकांनीही काही खबरदारी घेण्यासाठी इतरांच्या मदतीसाठीच तत्पर राहिले पाहिजे, असे आवाहन देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी केले. कोणत्याही मदतीसाठी आपण कायम तत्पर राहू, भादोल्याचा आदर्श घेऊन इतर गावांनी देखील असा उपक्रम राबवावा, त्यासाठी आपणे शक्य ती मदत करु, अशी ग्वाही देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे यांनी नियमित मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे आणि लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करत भादोला येथील आयसोलेशन सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.

Post Top Ad

-->