औरंगाबाद जिल्ह्यात एकाही किराणा दुकानात, सुपर शॉपी आणि मॉल्समध्ये वाईनची विक्री करु देणार नसल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात जिथे वाईन विक्री केली जाईल तिथे नियम - कायदे मोडून विरोध करण्यात येईल. राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेत असल्याचं म्हणत आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्यालाही परवानगी द्यावी अशी टीका खासदार जलील यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांकडे आज गायी आणि म्हशी मोठ्या प्रमाणात आहेत तर दुधाच्या बाटलीची या किराणा दुकान आणि मॉल्समध्ये विक्री करण्यासाठीचा उपक्रम राज्य सरकारनं राबवावा. मात्र असं न करता राज्य सरकार आपली संस्कृती बिघडवण्याचं कारस्थान करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मार्च २०२२ ला पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असुन केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासिनता, कार्यपध्दतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केले. राज्यातील प्रत्येक गोरगरीब लोकांना सर्व सोयीसुविधायुक्त स्वत:ची पक्की घरे मिळणार असल्याचं जाहीर करुन कोट्यावधी रुपयांचे फलक आणि जाहीराती लावून शासकीय पैशांचा गैरवापर करुन सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची चेष्टा केली आहे. याचा लोकसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाब विचारणार असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.