विद्यार्थ्यांना कमी शुल्कात परदेशातील उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि.७ राज्यातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात परदेशातील नामांकित विद्यापींठामध्ये उच्च शिक्षण घेता यावे,यासाठी विद्यापीठाने परदेशी विद्यापींठासोबत सामंजस्य करार करावेत असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठ,चर्चगेट, मुंबई येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचा १०८वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव,प्र- कुलगुरू डॉ.रुबी ओझा,कुलसचिव विलास नांदवडेकर,जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल,
विभागप्रमुख, प्राध्यापक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपाल रमेश बैस म्हणाले, आर्थिक अडचणी मुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असून सुद्धा परदेशात उच्च शिक्षण घेता येत नाही.आणि परदेशातील विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या देशात उच्च शिक्षण घेता येत नाही म्हणून परदेशातील ज्या विद्यापीठांचे विद्यार्थी आपल्याकडे येतील त्या विद्यापीठांमध्ये त्याच शिक्षण शुल्कात आपले विद्यार्थी शिक्षण घेतील असा करार करावा. असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.
राज्यपाल म्हणाले,या विद्यापीठाचा 107 वर्षांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली प्रवास आहे. महिला विद्यापीठाने केवळ ज्ञानाद्वारे महिलांना सक्षम केले नाही तर लाखो कुटुंबांचा सामाजिक-आर्थिक स्तरही उंचावला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने उच्च शिक्षणातील महिलांसाठी एकूण नोंदणी प्रमाण (GER) सध्याच्या 27.9 टक्क्यांवरून 2035 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
महिलांसाठी व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका आहे.
कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर अनेक महिलांचे शिक्षण अपूर्ण राहते.त्यासाठी विद्यापीठाने स्वतःचा मुक्त आणि दूरस्थ शिक्षण विभाग सुरू करून उच्च शिक्षणापासून वंचित महिलांपर्यंत पोहोचावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पोषक वातावरण निर्माण करून त्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण कसे देता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करावा.असेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.
महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.यंदाच्या नागरी सेवा परीक्षेत पहिल्या ४ टॉपर्स महिला होत्या ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले, भारत देश जगाला हेवा वाटावा असा ज्ञानसंपन्न व गुणसंपन्न देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा आत्मनिर्भर, विश्वगौरव देश होण्याचे दिशेने वाटचाल सुरू आहे.देशाच्या विकासात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. महिलांमध्ये अधिक सहनशीलता, कल्पकता असते.
भारतीय मूल्ये आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी महिला सक्षमीकरण महत्वाचे आहे. असे सांगून या महिला विद्यापीठासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका आत्मविश्वासाने पार पाडतात. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम विकसित करून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रोत्साहन द्यावे. या महिला विद्यापीठाचे केंद्रीय विद्यापीठ व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल.असे सांगून मंत्री पाटील यांनी या विद्यापीठाच्या 108 व्या स्थापना दिनानिमित्त अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाचे सादरीकरण करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
दरम्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीवरील लघुपट दाखवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने करण्यात आली.