(APALA VIDARBHA LIVE NEWS NETWORK)
मेहकर. बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय केंद्रबिंदू असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी गुलाबी थंडीत राजकीय वातावरण गरमागरम होत आहे. मेहकर मतदार संघात तब्बल ३० उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत.यामध्ये १० उमेदवार हे विविध पक्षांकडून तर, तब्बल २० उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ असून अपक्ष तसेच इतर उमेदवारांचे मनधरणी करून आपले मते घेणाऱ्या उमेदवारांचा अर्ज मागे घेण्यासाठी लढतीतील प्रमुख उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. वेळप्रसंगी साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापरही होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मेहकर मतदारसंघात महाविकास आघाडी महायुती यास विविध पक्षाच्या उमेदवारांनी व अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करून विधानसभेच्या राजकीय आखाड्यात दंड थोपटले आहेत. अर्ज छाननी नंतर तब्बल ३० उमेदवारांचे अर्ज हे पात्र ठरल्यानंतर दि.४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लढतील प्रमुख उमेदवारांकडून आपल्या मताचे विभाजन करणाऱ्या उमेदवारांची मनधरणी करून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लढतीतील उमेदवाराकडून साम, दाम, दंड, भेद नितीचाही वापर केल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ असली तरी ३ नोव्हेंबर पासूनच मताचे विभाजन करणाऱ्या व निवडून येणार नसल्याचा अंदाज असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. रविवारची रात्र ही उमेदवारांची मनधरणी करण्यात गेली असताना ४ नोव्हेंबर रोजी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात आणि कोणाला पाठिंबा देता याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. निवडून न येणाऱ्या परंतु अर्ज मागे घेण्यासाठी तयार नसलेल्या उमेदवारांच्या भूमिकेमुळे मात्र मतदारसंघातील राजकीय चित्र पालटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज यांना मागे न घेतल्यास याचा परिणाम लढतीतील प्रमुख उमेदवारांवर होण्याचा अंदाज राजकीय तज्ञ बांधत आहेत. तर अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे चर्चा मतदारसंघात सुरू आहे दि.४ नोव्हेंबर रोजी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो व कोण निवडणुकीच्या मैदानात कायम राहत याचे चित्र तीन वाजेनंतर स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मात्र चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
३० उमेदवारांनी दाखल केले आहेत अर्ज मेहकर विधानसभा मतदार सघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून सिद्धार्थ रामभाऊ खरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून भैय्यासाहेब गोविंदराव पाटील, शिवसेना पक्षाकडून संजय भास्कर रायमुलकर, बहुजन समाज पार्टी पक्षाकडून संजय समाधान कळसकर, वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून डॉ. ऋतुजा ॠषांक चव्हाण, महाराष्ट्र स्वराज पार्टी पक्षाकडून दीपक केदार, जय सेवालाल बहुजन विकास पार्टी पक्षाकडून नितीन बालमहेंद्र सदावर्ते, राष्ट्रीय समाज पक्षाकडून रजनीकांत सुधीर कांबळे, रिपब्लिकन सेना पक्षाकडून संघपाल कचरू पनाड, आजाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाकडून संदीप शामराव खिल्लारे हे उमेदवार रिंगणात असून आपले नशीब आजमावत आहेत.तर अपक्ष म्हणून अशोक वामन हिवाळे, अड्. ओम श्रीराम भालेराव, कैलास कचरू खंदारे, सिद्धार्थ प्रल्हाद खरात, डॉ. गोपालसिंह बछिरे डॉ. जितेश वसंत साळवे, डॉ.जानू जगदेव मानकर,देविदास पिराजी सरकटे, नरहरी ओंकार गवई, प्रकाश गणपत अंभोरे, प्रकाश चिंधाजी गवई, पुनम विजय राठोड, भास्कर गोविंदा इंगळे, महिपत पुंजाजी वाणी, मुरलीधर दगडू गवई, राजेश अशोकराव गवई, लक्ष्मणराव जाणुजी घुमरे, वामनराव सूर्यभान वानखडे, डॉ. संतोष चंद्रकांत तायडे डॉ. सांची सिद्धार्थ खरात हे उमेदवार अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. यातील किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे लक्ष लागलेली आहे.