डोणगाव जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाणारी डोणगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा ठराव संमत करण्यात आला. जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोणगाव परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची पीकं पूर्णपणे नष्ट झाली, तर काहींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. #LIVE डोणगाव ग्रामसभा – लोकशाहीचा उत्सव थेट आपल्या मोबाईलवर!…
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी केली असून, यासंबंधीचा ठराव संमत करून जिल्हाधिकारी मार्फत तो राज्य शासन आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. सरपंच चरण आखाडे यांनी ही माहिती ग्रामसभेत दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, “शेतकरी सध्या अडचणीत अडकला असून, शासनाने तात्काळ मदतीची घोषणा केली पाहिजे. म्हणूनच आम्ही ओल्या दुष्काळाची अधिकृत मागणी करत आहोत.”
दरम्यान, गावातील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने देखील ग्रामसभेत कडक पावलं उचलण्यात आली आहेत. सरपंचांनी सांगितले की, "गावातील काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असून त्यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात येत आहे. आता यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत." ग्रामपंचायतीच्या वतीने रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यक्तींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असेही ते म्हणाले.
या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय निश्चितच सकारात्मक दिशेने पाऊल असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी नमूद केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल आखाडे यांनी ग्रामसभेत मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या संकटाची जाणीव व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "शेतकरी अन्नदाता असून, त्यांनी निसर्गाशी झुंज देत आपला संसार चालवतो. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची अक्षरशः होरपळ झाली आहे." त्यांनी पुढे ग्रामपंचायतीकडे विनंती करत ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यासाठी ठराव घ्यावा, अशी मागणी केली होती. ही मागणी ग्रामसभेत मान्य करण्यात आली.