संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश : "फळबागांचे पंचनामे करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल!" - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 29, 2025

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश : "फळबागांचे पंचनामे करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल!"

  (Apala Vidharbh news network)

बुलढाणा, मेहकर व लोणार तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या निसर्गाच्या लहरीने अक्षरशः उध्वस्त केलं आहे. अवकाळी पावसाने त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं असून, या नुकसानाची अद्याप कोणतीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही, अशी आर्त हाक त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, सन २०२५-२६ मधील मृग व अंबिया बहारातील संत्रा फळबागांना अवेळी अतिवृष्टीचा जबर फटका बसला. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडांना ताण येऊन फळांची आगाऊ गळ झाली. त्यानंतर जून महिन्यातील पावसाचा खंड आणि भीषण उष्णतेने उरलेली फळेही गळून गेली. परिणामी, शेतकरी संपूर्ण मृग बहार उत्पादनास मुकले आहेत.केवळ मृग बहारच नव्हे, तर अंबिया बहारालाही बुरशीजन्य रोग आणि पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. संत्रा झाडे सडून गेल्याने अनेक बागांचे संपूर्ण उत्पादनच जमीनदोस्त झाले आहे. यंदा जिल्ह्यात १२५० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस संत्रा उत्पादनासाठी धोकादायक ठरल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोयाबीन, तूर यांचे पंचनामे झाले, मग फळबागांचे का नाही? शेतकऱ्यांनी आपल्या व्यथेचा पाढा वाचत सांगितले की, "सोयाबीन, तूर व इतर पारंपरिक पिकांचे पंचनामे वेगाने करण्यात आले, मात्र संत्रा व इतर फळबागांचे पंचनामे अद्यापही झालेलं नाहीत. बागायती शेतीवर आधारित असलेल्या शेतकऱ्यांच्या हाता-पायाला प्रशासनाने जणू बांध घातला आहे!"

बागायती शेती ही केवळ उत्पन्नाचे साधन नाही, तर शेतकऱ्यांची जीवनशैली, त्यांची ओळख आहे. मात्र आज हीच ओळख संकटात सापडली आहे. कर्जबाजारीपणा, उत्पादन नसल्याने उत्पन्नाचा अभाव, आणि सरकारी मदतीची प्रतीक्षा – या चक्रात बागायतदार अडकून पडले आहेत.

मागण्यांचे निवेदन व आंदोलकांचा इशारा

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनासमोर पुढील ठाम मागण्या मांडल्या आहेत: 

 संत्रा व इतर फळबागांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत.

 सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.

 संपूर्ण जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा.

या मागण्या मान्य न झाल्यास, शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला आहे. "आम्ही रस्त्यावर उतरून आमचा हक्क मागू, कारण आमचं आयुष्य आता सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे," असा इशारा त्यांनी दिला.

नेतृत्व व सहभाग या निवेदनास शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाक्षरी करून साथ दिली आहे. यामध्ये माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर यांनी नेतृत्व केले असून, त्यांच्यासोबत आशिष आंबेकर, सुरज दिनोरे, प्रितेश डहाके, प्रतीक आखाडे, सुधीर आखाडे, अमोल जाधव, गजानन आखाडे, रविंद्र आखाडे, सतीश आखाडे, सुभाष पळसकर, मुरलीधर लांबाडे आदी बागायतदार उपस्थित होते.

या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मकरंद पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा यांना सादर करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांची अवस्था पाहता फक्त मदतीची नव्हे, तर सहवेदनेचीही गरज आहे. आता प्रशासन त्यांच्या या भावनिक आणि आर्थिक संघर्षाला कशी प्रतिसाद देते, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Post Top Ad

-->